आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींची \'मन की बात\'- सरकार उत्तरदायी असणे गरजेचे; जनतेला कामाचा हिशेब द्यावाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवर आपल्या ३२ व्या ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद साधला. सरकारला ३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते म्हणाले की, ‘लोकशाहीत सरकारांनी जबाबदार असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांनी आपल्या कामांचा हिशेब द्यायला हवा.’ मुस्लिमांना रमजानच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, ‘हा पवित्र महिना देशात शांतता, एकता आणि सद््भाव वाढवण्यासाठी सहायक होईल.’  

मोदी म्हणाले, ‘२१ जून आता सर्वांना माहीत झाला आहे. हा तिसरा योग दिवस आहे. एका कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी सोबत योग करावा आणि त्याची छायाचित्रे अपलोड करावीत, अशी सूचना आली आहे. हे छायाचित्र आशादायी भविष्याची हमी असेल. आजपासून त्याचा सराव सुरू करा. एक जूनपासून मी सतत योग या विषयावर ट्विटरवर काही ना काही पोस्ट करतच राहीन. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस आहे. आपण झाडे लावून पर्यावरण वाचवायला हवे. आमच्या पूर्वजांनी जे केले, त्याचा फायदा आम्हाला मिळत आहे. अथर्ववेदात निसर्गाबाबत उल्लेख आहे. वेदांमध्ये पृथ्वी वाचवा असे सांगण्यात आले आहे. महात्मा गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाणही झाडाच्या खालीच झाले होते. अनेक समुदायांत निसर्ग हा जीवनाचा एक भाग आहे.   पाऊस पडला की वृक्षारोपण केले जाते. अनेक जागी मोहिमा चालवल्या जातात. आपण झाडे लावून निसर्गाचे संवर्धन करायला हवे.’
 
भारतात प्रत्येक प्रकारे पूजा करणारे लोक
मोदी म्हणाले, ‘या वर्षीचा उन्हाळा आपण विसरू शकू असे वाटत नाही. पावसाची प्रतीक्षा होत आहे. रमजाननिमित्त मी जगभरातील मुस्लिमांना शुभेच्छा देत आहे. या पवित्र महिन्यात अध्यात्म आणि प्रार्थनेला महत्त्व दिले जाते. भारतात प्रत्येक प्रकारची पूजा पद्धती असणारे लोक राहतात. कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा, असे मी गेल्या वेळी म्हटले होते. अनेक लोकांनी मला फीडबॅक दिला. कोणी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला, कोणी यूट्यूबद्वारे शिकत आहेत. काही जण नृत्य, तर काही जण नाटक शिकत आहेत. काही निसर्गापासून शिकत आहेत.’
 
आज सावरकर जयंती, सेल्युलर तुरुंग स्वातंत्र्यतीर्थ
मोदी म्हणाले, ‘आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. ते अंदमानमध्ये कैद होते. सेल्युलर जेलला काळे पाणी का म्हटले जात होते, ते तेथे गेल्यावरच कळते. ते स्वातंत्र्याचे तीर्थ आहे. शहिदांनी आंदोलन केल्यामुळेच आज आपण स्वतंत्र हिंदुस्तानमध्ये श्वास घेऊ शकत आहोत. वीर सावरकर तुरुंगाच्या भिंतींवर लिहीत असत.’ या कार्यक्रमादरम्यान दीपा कत्याल म्हणाल्या की, ‘भारताला स्वातंत्र्य मि‌ळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे मी जेव्हा वाचले तेव्हा मला भगतसिंग यांची ओळख झाली. आगामी पिढ्यांना याबाबत माहिती द्यायला हवी.’
 
सरकारची ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मानले आभार
मोदी म्हणाले, ‘सरकारची ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ३ वर्षांपूर्वी तुम्ही मला प्रधान सेवक बनवले आहे. ज्यांनी आमच्या कामाचे चांगले-वाईट मूल्यमापन केले, आमच्या उणिवा सांगितल्या त्या सर्व लोकांचे आभार. त्यामुळे सुधारणा करण्याची संधी मिळेल. रचनात्मक टीका विकासासाठी आवश्यक आहे. प्रत्येक कसोटीवर सरकारला पारखण्यात आले आहे. सरकारने उत्तरदायी असले पाहिजे.’ केंद्रातील भाजपच्या सरकारने २६ मे रोजीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत.
 
‘मन की बात’ने प्रत्येक घराचे सदस्य बनवले
मोदी म्हणाले, ‘मीही तुमच्याप्रमाणेच सामान्य नागरिक आहे. तुमच्याप्रमाणेच माझ्यावरही चांगल्या-वाईट गोष्टींचा परिणाम होतो. मी कुटुंबात बसूनच बोलत आहे, असे वाटते. अलीकडेच मन की बातवर एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याबद्दल मी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांचे आभार मानतो.’
 
स्वच्छता मोहिमेची आता झाली चळवळ 
मोदी म्हणाले, ‘लाल किल्ल्यावरून स्वच्छतेबाबत पहिल्यांदा बोलल्यानंतर मी पाहिले की, लोकांनी आता या मोहिमेला मोठे रूप दिले आहे.’ मुंबईतील नैना म्हणाली, ‘मोदीजी, तुम्ही जेथे जाता, तेथे लोक स्वच्छतेकडे जास्त लक्ष देतात. काशीच्या घाटापासून सुरू झालेल्या मोहिमेने मोठे स्वरूप घेतले आहे. आता कोणी रस्त्यावर कचरा टाकला तर लोक त्याला टोकतात.’ त्यावर मोदी म्हणाले, ‘माझ्या दौऱ्याला स्वच्छतेची जोड दिली जात आहे याचा मला आनंदच आहे. हा कचरा म्हणजे वेस्ट नसून वेल्थ आहे. त्याचे वेस्ट मॅनेजमेंट केले जाऊ शकते. आपण एक नवी संस्कृती विकसित करू, असा मला विश्वास आहे. तेव्हाच गांधीजींचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.’
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...