आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Claimant In Congress For 1 Seat Of Rajyasabha

राज्यसभा : काँग्रेसची जागा एक; दावेदार अनेक!, भाजपचे संख्याबळ वाढणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सहा राज्यसभा सदस्य येत्या ४ जुलै राेजी निवृत्त हाेत अाहेत. नव्या संख्याबळानुसार भाजपचे तीन, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अाणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर जाऊ शकताे. निवड प्रक्रिया ही अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच सुरू हाेईल; परंतु एकमेव जागा असलेल्या काँग्रेसमध्ये अातापासूनच उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली अाहे.

राज्यसभेतील काँग्रेसचे विद्यमान खासदार विजय दर्डा, अविनाश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल आणि ईश्वरलाल जैन, शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपचे मंत्री पीयूष गाेयल निवृत्त हाेत अाहेत. गाेयल मंत्री असल्याने त्यांना भाजपकडून पुन्हा उमेदवारी मिळेल. याशिवाय आणखी दोन नव्या नेत्यांना भाजप या सर्वोच्च सभागृहात पाठवू शकणार आहे. परंतु भाजपमध्ये अद्याप याबाबत चर्चादेखील सुरू झालेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा प्रफुल्ल पटेल यांनाच उमेदवारी मिळणार असे संकेत अाहेत. शिवसेनेचे संजय राऊत पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असले तरी त्यांना विराेध करणारे अनेक नेते अाहेत. काँग्रेसमध्ये विजय दर्डा आणि अविनाश पांडे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका राष्ट्रीय महासचिवाने दिली. संघटन काैशल्य असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी सरचिटणीस विलास मुत्तेमवार आणि मुंबईचे गुरुदास कामत यांच्या नावाची चर्चा अाहे. परंतु पक्षाकडे एकच जागा आणि इच्छुक जास्त, अशी परिस्थिती असल्याने त्यासाठी चुरस वाढणार आहे. कामत आणि मुत्तेमवार यांनी राज्यसभा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले असल्याची माहितीही सूत्राने दिली अाहे;

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडणे व त्यात वस्तू व सेवा करासह इतर महत्त्वाची प्रलंबित विधेयके मंजूर करवून घेण्याबाबत सत्ताधारी पक्षाला चिंता आहे. त्यामुळे राज्यसभेवर काेणाला पाठवायचे? हा विषय तूर्तास तरी भाजप श्रेष्ठींच्या अजेंड्यावर नाही. या मुद्द्यावर पक्षात प्राथमिक चर्चाही सुरू झालेली नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.