आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमात स्टेम सेल प्रत्यारोपणाचा धडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये मूळ पेशी (स्टेम सेल) प्रत्यारोपणाशी संबंधित धडा समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. तरुण डॉक्टरांमध्ये विशेषकरून रक्ताशी संबंधित विकारातील उपचार पद्धतीत जागृती निर्माण करण्यासाठी या विषयाचा अभ्यासात समावेश केला जात आहे.
नव्या प्रस्तावानुसार, स्टेम सेलचे महत्त्व आणि प्रत्यारोपणाचे तंत्र या विषयावर स्वतंत्र धडा असेल, असे एमसीआयचे सदस्य नवीन डांग यांनी आंतरराष्ट्रीय अस्थिमज्जा प्रत्यारोपण परिसंवादात सांगितले. भारतामध्ये स्टेम सेल दान करण्याबाबत तेवढी जागृती नाही. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमात स्टेम सेल प्रत्यारोपणाची माहिती दिल्यास डॉक्टरांमध्ये व पर्यायाने समाजामध्ये ही पेशी दान करण्याबाबत जागृती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिका, जर्मनी आणि भारतातील या क्षेत्रातील तज्ज्ञ परिसंवादात सहभागी झाले असून त्यांनी या विषयातील अद्ययावत संशोधनाची देवाणघेवाण केली. भारत स्टेम सेल या स्वयंसेवी संस्थेने परिसंवादाचे आयोजन केले आहे. स्टेम सेल दात्याची वाट पाहत भारतात दरवर्षी रक्ताचा कर्करोग व त्यासंबंधित व्याधीमुळे साधारण 50 हजार रुग्णांचा मृत्यू होतो. रक्ताच्या कर्करुग्णांसाठी स्टेम सेल दाता मिळणे हे त्यांच्यासाठी जिवंत राहण्याचा एकमेव मार्ग असतो. मात्र दात्याचे स्टेम सेल रुग्णाशी जुळण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.