आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा माेर्चांची माेदी सरकारला धास्ती! आरक्षण देण्याबाबत केंद्र अनुकूल, फडणवीसांना धोका नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात लाखाेंच्या संख्येने निघणाऱ्या मराठा क्रांती माेर्चाने केंद्रातील भाजपचे सरकार पुरते हादरले अाहे. या पक्षातील केंद्रीय नेत्यांची महाराष्ट्रातील प्रत्येक माेर्चावर सूक्ष्म नजर अाहे. सरकारविराेधी राेष वाढू नये म्हणून ‘अाम्ही या मोर्चांचे स्वागतच करताे,’ असे सांगण्याचा व भासवण्याचा प्रयत्न भाजपचे मंत्री व पदाधिकारी करत अाहेत.
भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या अांदाेलनाने जसे हिंसक वळण घेतले तसा प्रकार महाराष्ट्रात केव्हाही हाेऊ शकताे अशी धास्ती पक्षाला वाटते. गुजरातमध्ये हार्दिक पटेल हा तरुण अांदाेलनाचे नेतृत्व करीत हाेता, परंतु महाराष्ट्रात लाखाेंच्या या गर्दीचा माेर्चा असूनही काेणीच नेता समाेर येत नसल्याने या अांदाेलनाला केव्हाही हिंसक वळण लागू शकते, अशी भीतीही भाजपमधून व्यक्त केली जात अाहे. या विषयावर पंतप्रधान नरेंद्र माेदी अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्कात असून मराठ्यांच्या मोर्चांना थाेपविण्यासाठीची रणनिती अाखली जात अाहे. या परिस्थितीत मराठा समाजाच्या अारक्षणासाठी अनुकूलता दाखविण्याशिवाय पर्याय सरकारकडे नसल्याची माहिती भाजपच्या उच्चस्तरीय सूत्राने दिली. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला मात्र धाेका नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात अाले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर म्हणाले, ‘मराठा माेर्चाचे अापण स्वागतच करताे. या गर्दीमुळे देशाला महाराष्ट्राची संस्कृती कळत अाहे. यापूर्वी देशात अाणि महाराष्ट्रात असे भव्य मोर्चे निघालेत तेव्हा त्यात हिंसा पाहायला मिळाली. परंतु हे मोर्चे अगदी शांततेत निघत अाहेत, ते काैतुकास्पद अाहे. हीच शिस्तबद्धता पुढेही कायम राहिल,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यातील अाेबीसींनी मराठा अारक्षणाला विराेध करू नये, त्यांना मी समजविणार असल्याचेही ते म्हणाले. तर भाजपच्या प्रभारी सराेज पांडे यांनी या मोर्चांवर अामची नजर असून फडणवीस याेग्य पद्धतीने विषय हाताळत असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचाच हात : राऊत
मराठा मोर्चामागे राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा थेट आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना अखंड महाराष्ट्राची पुरस्कर्ता असल्यामुळे शिवसेनेवर हल्ले केले जातात. काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे नेते मराठा मोर्चांचे पडद्यामागून सूत्रसंचालन करीत अाहेत. मराठ्यांचे अारक्षण न्यायपालिकेने फेटाळावे म्हणून काॅग्रेस- राष्ट्रवादीनेच प्रयत्न केले हाेते. नारायण राणे हे समितीचे अध्यक्ष होते, ते काॅग्रेसचे नेते आहेत, मग आरक्षण कोर्टाने का फेटाळले? असा सवालही त्यांनी केला. दलित, मराठा व मुसलमान यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे असे शिवसेनेची भूमिका अाहे. मराठा अारक्षणावर राष्ट्रवादी संसदेत गप्प का असते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुप्तचर खाते असल्याने त्यांना सगळं माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना घालविण्याचा राष्ट्रवादीचा कुटील डाव कधीही यशस्वी हाेणार नसल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.
अाेबीसी लाभापासून वंचित : डाॅ. शकील अन्सारी
महाराष्ट्रात गेल्या २२ वर्षापासून १०६ जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यास महाराष्ट्र सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे हा समाज ओबीसीच्या लाभापासून वंचित अाहे, असा खुलासा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे सदस्य डाॅ. शकील अन्सारी यांनी केला. एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली असतानाच ओबीसी समाजासाठी राज्य सरकारने काय केले, ही बाबही तपासून पाहिली पाहिजे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर मराठा समाज १०७ व्या क्रमांकावर जाईल. अगोदर १०६ जातींबद्दल महाराष्ट्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतरच मराठा समाजाकडे महाराष्ट्र सरकारला वळता येईल, असेही ते म्हणाले.
शरद पवारांचाच ‘ब्रेन’!
मराठ्यांच्या मोर्चामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा ब्रेन असल्याचे भाजपचे केंद्रातील नेते नाव न छापण्याच्या अटीवर सांगत अाहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर झालेले भ्रष्टाचाराचे अाराेप, छगन भुजबळ यांच्यानंतर अजित पवार सिंचनाच्या प्रकरणात अडकण्याची शक्यता; या सगळ्याच राजकीय पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी मराठा समाजाचा खुबीने वापर करून घेत असल्याची कुजबुज भाजपमध्ये सुरू अाहे.
बातम्या आणखी आहेत...