नवी दिल्ली- दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची हॅट््ट्रिक साधणाऱ्या शीला दीक्षित यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार म्हणून पुढे केले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दीक्षित यांच्या नावाची शिफारस केली असून त्यांच्या ब्राह्मण चेहऱ्यामुळे पक्षाला प्रचारात फायदा होऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ब्राह्मण समाजाच्या पाठिंब्यामुळे अनेक जागांवर त्याचा परिणाम दिसू शकेल. ब्राह्मण समाज काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मंदिर-मंडल आयोगाच्या राजकारणानंतर हा समाज भाजपकडे वळला. मायावती यांनी ब्राह्मण समाजातील नेत्यांना उमेदवारी दिल्यामुळे ब्राह्मण समाजाची बहुतांश मते बसपाला मिळाली होती. दीक्षित काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ७८ वर्षीय दीक्षित यांनी १९९९ ते २०१४ दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. उत्तर प्रदेशचे दिग्गज काँग्रेस नेते उमा शंकर दीक्षित यांच्या त्या स्नूषा आहेत. उमा शंकर दीक्षित यांनी केंद्रीय मंत्री म्हणून आणि राज्यपाल म्हणून काम केले आहे.
४०३ सदस्यांच्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे सध्या ३० आमदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात विजय प्राप्त केला होता. संबंधित मतदारसंघाचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी प्रतिनिधित्व करत आहेत. ब्राह्मण समाज मध्य आणि पूर्व उत्तर प्रदेशातील मतदानावर छाप पाडू शकतात. या भागात ब्राह्मण समाजाचे प्राबल्य आहे.
बंगळुरू- आगामी वर्षी येऊ घातलेली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत लोकजनशक्ती पक्षाने(एलजेपी) दिली आहे. निवडणुकीत भाजपसोबतच्या आघाडीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी सांगितले. एलजेपी केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. याच धर्तीवर उत्तर प्रदेशात निवडणूक लढू इच्छित आहोत. भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे त्यांनीच या मुद्द्यावर स्वत:हून बोलावे. यासंदर्भात भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत लवकरच बैठक होईल, असे चिराग पासवान यांनी सांगितले. केंद्रीय अन्न मंत्री आणि एलजेपीचे संस्थापक रामविलास पासवान यांचे चिराग पुत्र आहेत. आघाडी झाली तर ठीक अन्यथा पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवेल.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)