आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jnanpith Award For Marathi Writer Bhalchandra Nemade

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ, मायमराठीच्या शिरपेचात चौथ्यांदा मानाचा तुरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मराठी साहित्य विश्वाला देशीवादाची जाणीव करून देऊन स्वत:चा वेगळा संप्रदाय निर्माण करणारे ख्यातनाम साहित्यिक व मर्मग्राही समीक्षक प्रा.भालचंद्र नेमाडे यांना भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा ५० वा ज्ञानपीठ पुरस्कार शनिवारी जाहीर झाला. मराठी साहित्य विश्वातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून ज्ञानपीठ मिळवणारे ते चौथे मराठी साहित्यिक आहेत. नेमाडेंच्या रूपाने मराठीच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.

जळगावच्या सांगवी येथे १९३८ मध्ये जन्मलेले नेमाडे कादंबरीकार, कवी व समीक्षक आहेत. मराठी साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरलेली ‘कोसला’ ही पहिली कादंबरी त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षी १९६३ मध्ये प्रसिद्ध झाली. ज्ञानपीठ पुरस्कारांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून याच वर्षात नेमाडेंना ५० वा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे ५५ वे साहित्यिक आहेत. ११ लाख रुपये, प्रशस्तिपत्र व वाग्देवीची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

‘कोसला’ ते ‘अडगळ'
‘कोसला'नंतर नेमाडेंनी लिहिलेल्या बिढार, जरीला, झूल या कादंबर्‍याही गाजल्या. ‘हिंदू- एक समृद्ध अडगळ' ही त्यांची कादंबरीही वाचकांच्या पसंतीस उतरली. नेमाडे यांचे ‘देखणी’ आणि ‘मेलडी’हे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. ‘टीकास्वयंवर’, ‘साहित्याची भाषा’, ‘तुकाराम’ ही समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

नेमाडपंथाचे जनक : भालचंद्र नेमाडे यांचे लिखाण, त्यांचे विचार आणि तितकीच बेधडक मांडणी यामुळे मराठी साहित्याच्या विश्वात त्यांचा स्वतंत्र असा एक नेमाडपंथच निर्माण झाला आहे.

अजरामर पांडुरंग : ‘कोसला’ कादंबरीने मराठी साहित्याची परिमाणेच बदलून टाकली. तिने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर ही व्यक्तिरेखा अजरामर ठरली.

प्रबुद्ध आणि जागरूक लेखक
नेमाडेंनी ग्रामीण व आधुनिक जीवनातील जगण्याच्या प्रक्रियेचे स्तर- अस्तर सूक्ष्मपणे निरखून त्यांना शब्दरूप दिले. नेमाडेंनी वैश्विक स्तरावर प्रबुद्ध आणि जागरूक लेखक म्हणून लौकिक मिळवला आहे, अशा शब्दांत ज्ञानपीठने नेमाडेंचा गौरव केला आहे.

मराठी वाङ‌्मय विश्वात देशीवादाची मांडणी
व्यवसायाने प्राध्यापक असलेले भालचंद्र नेमाडे चाहत्यांमध्ये ‘नेमाडे सर’ म्हणूनच लोकप्रिय असून गेली ५० वर्षे कादंबरी, कविता आणि समीक्षात्मक ग्रंथांच्या रूपाने मराठी साहित्याची सेवा करत आहेत. लेखन करतानाच विविध व्यासपीठांवरून भाषा, साहित्य व संस्कृतीबद्दल ते परखड विचार मांडत आले आहेत. मराठी साहित्यात त्यांनी देशीवादाची मांडणी केली आहे.

- मराठी माणसाच्या अभिरुचीचा अभिमान वाटतो. त्यांनी माझे लिखाण सहन केले. मला तुरुंगात जावे लागले नाही की माझ्याविरोधात कुणी आंदोलने केली नाहीत. विंदा करंदीकरांच्या परंपरेचा मी पाईक ठरल्याचा अभिमान वाटतो. नव्या लेखकांनीही करंदीकरांची ही परंपरा पुढे न्यावी. - भालचंद्र नेमाडे