आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Novelist Bhalchandra Nemade Chosen For Jnanpith Award News In Marathi

\'कोसला\'कार डॉ.भालचंद्र नेमाडेंचा आज \'ज्ञानपीठ\' देऊन सन्मान होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- मराठी साहित्य विश्वाला देशीवादाची जाणीव करून देऊन स्वत:चा वेगळा संप्रदाय निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार डॉ. भालचंद्र नेमाडे यांना आज (शनिवारी) ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. 11 लाख रुपये, प्रशस्तिपत्र व वाग्देवीची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संसदेच्या बालयोगी सभागृहात संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम आयोज‍ित करण्‍यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉॅ.भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. डॉ.नामवर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतीय साहित्यातील सर्वोच्च समजला जाणारा 50 वा ज्ञानपीठ पुरस्कारासाठी भालचंद्र नेमाडे यांची निवड केली आहे.

जळगावच्या सांगवी येथे 1938 मध्ये जन्मलेले भालचंद्र नेमाडे कादंबरीकार, कवी व समीक्षक आहेत. मराठी साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरलेली ‘कोसला’ ही पहिली कादंबरी त्यांच्या वयाच्या 25 व्या वर्षी 1963 मध्ये प्रसिद्ध झाली. ज्ञानपीठ पुरस्कारांचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून याच वर्षात नेमाडेंना 50 वा पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे नेमाडे हे 55 वे साहित्यिक आहेत.
‘कोसला’ ते ‘अडगळ'
‘कोसला'नंतर नेमाडेंनी लिहिलेल्या बिढार, जरीला, झूल या कादंबर्‍याही गाजल्या. ‘हिंदू- एक समृद्ध अडगळ' ही त्यांची कादंबरीही वाचकांच्या पसंतीस उतरली. नेमाडे यांचे ‘देखणी’ आणि ‘मेलडी’हे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. ‘टीकास्वयंवर’, ‘साहित्याची भाषा’, ‘तुकाराम’ ही समीक्षात्मक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

नेमाडपंथाचे जनक : भालचंद्र नेमाडे यांचे लिखाण, त्यांचे विचार आणि तितकीच बेधडक मांडणी यामुळे मराठी साहित्याच्या विश्वात त्यांचा स्वतंत्र असा एक नेमाडपंथच निर्माण झाला आहे.

अजरामर पांडुरंग : ‘कोसला’ कादंबरीने मराठी साहित्याची परिमाणेच बदलून टाकली. तिने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर ही व्यक्तिरेखा अजरामर ठरली.

प्रबुद्ध आणि जागरूक लेखक
नेमाडेंनी ग्रामीण व आधुनिक जीवनातील जगण्याच्या प्रक्रियेचे स्तर- अस्तर सूक्ष्मपणे निरखून त्यांना शब्दरूप दिले. नेमाडेंनी वैश्विक स्तरावर प्रबुद्ध आणि जागरूक लेखक म्हणून लौकिक मिळवला आहे, अशा शब्दांत ज्ञानपीठने नेमाडेंचा गौरव केला आहे.

दरम्यान, यापूर्वी मराठी साहित्यात 1987 साली वि.वा.शिरवाडकर, 1974 साली वि.स.खांडेकर यांना तर 2003 साली विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ज्ञानपीठ विजेते नेमाडे हे मराठीतील चौथे साहित्यिक ठरले आहेत.