आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छीमारांच्या हत्येचा खटला दररोज चालवा : सर्वोच्च न्यायालय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय मच्छीमारांच्या हत्येप्रकरणात दोन इटालियन खलाशांविरुद्ध तपास करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्याचबरोबर यासंदर्भातील खटला दररोज चालवण्यात यावा, असे निर्देश विशेष न्यायालयास दिले आहेत.


सरन्यायाधीश अल्तमस कबीर यांच्या पीठाने विशेष न्यायालयाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा केला. न्यायालयात केवळ याच प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सुनावणी पूर्ण होईपर्यंत इटलीचे खलाशी सालवाटोर गिरॉन आणि मास्सीमिलिआनो लाटोरे यांना कोठडीतच राहावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. खलाशांवर खटला चालवण्यास इटली सरकारने आक्षेप घेतला होता. राष्ट्रीय तपास संस्थेकडे तो सोपवणे चुकीचे आहे. प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याचा आग्रह इटलीकडून करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर इटली सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.


इटलीचा आक्षेप काय होता ?
खलाशांवर एनआयएच्या माध्यमातून आरोप निश्चित करणे अयोग्य आहे. नौदल सुरक्षेला धोका निर्माण होत असेल तर एनआयए तपास करू शकते. त्यामुळे याअंतर्गत गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे, असे इटली सरकारचे म्हणणे होते. त्याला सर्वोच्च् न्यायालयाने फेटाळून लावले आहे.


इटलीने खटल्याविषयीची शंका
दूर करावी : परराष्ट्रमंत्री

भारतीय मच्छीमारांच्या हत्येप्रकरणातील सुनावणीविषयी कोणताही संशय ठेवू नये. खलाशांवर दहशतवाद कायद्याखाली खटला चालवण्यात येणार नसल्याचा पुनरुच्चर परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी केला आहे. खुर्शीद यांनी इटलीला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. एनआयए ही भारतात उपलब्ध असलेली एकमेव तपास संस्था आहे. सर्वोच्च् न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी केली जात आहे, अशा शब्दांत खुर्शीद यांनी इटली सरकारचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.


काय आहे प्रकरण : गेल्या वर्षी 15 फेब्रुवारी रोजी इटलीच्या जहाजातून आलेल्या दोन खलांशांनी भारतीय सागरी क्षेत्रात गोळीबार करून दोन मच्छीमारांची हत्या केली होती. केरळ समुद्रकिनारी ही घटना घडली होती. त्यावरून भारत-इटली यांच्यातील राजनैतिक संबंधही ताणले गेले होते. हे दोन खलाशी सणाच्या निमित्ताने मायदेशी गेले होते. सर्वोच्च् न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांना सण साजरा करण्याची परवानगी मिळाली होती. खलाशांनी सण साजरा करून भारतात परतण्याचे न्यायालयात मान्य केले होते, परंतु इटली सरकारने खलिता पाठवून खलाशी परतणार नसल्याचे कळवले होते. त्यानंतर उभय देशांतील संबंधांवर त्याचा परिणाम दिसून आला होता. अखेर इटलीने खलाशांना भारतात पाठवले. त्यानंतर उभय देशांतील तणाव निवळला होता.