आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK मीडियाचा दावा- अझहर अरेस्ट; मंत्री म्हणाले- आम्हाला माहित नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पठाणकोट हल्ल्याचे षडयंत्र रचणाऱ्या संशयिचांवर पाकिस्तानमध्ये कारवाई सुरु आहे. पाकिस्तान पोलिस आणि संरक्षण यंत्रणांनी धडक कारवाई करत तीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे, की जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरलाही अटक करण्यात आले आहे, तर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खलीलउल्ला काझी म्हणाले, 'अझहरला ताब्यात घेतल्याची आम्हाला काही माहिती नाही.'

का पकडले विद्यार्थ्यांना ?
- पाकिस्तानी टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, गुप्तचर यंत्रणेने लाहोर विद्यापीठातील मॅनेजमेंट सायन्सच्या तीन विद्यार्थ्यांना - उस्मान सरवर, साद मुगल आणि कासिफ यांना बुधवारी अटक केली.
- भारताने जे पाच मोबाइल नंबर पाकिस्तानला दिले होते, ते यांचे असल्याचे सांगितले जात आहे.
- विद्यापीठाला सुटी असल्यामुळे एकाही विद्यार्थ्याला विद्यापीठातून अटक झाली नाही. या वृत्ताची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

बहावलपूर येथे घेतला गेला शोध, पेशावरमधून मिळाले इनपूट, अटक इस्लामाबादेतून

1 - कुठे पकडले?
- पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी 11 जानेवारी रोजी इस्लामाबादच्या सेक्टर G-10/4 येथे छापा टाकला. हे घर अझहरचा मेव्हणा अश्फाक अहमदचे आहे.
- पाकिस्तानी मीडियाने दावा केला, की अझहर याच घरात लपून बसला होता. पाकिस्तानी पोलिस आणि संरक्षण यंत्रणा त्याचा पेशावर, बहावलपूर आणि लाहोर येथे शोध घेत होती, त्यामुळे तो इस्लामाबादमध्ये दडून बसला होता.
2 - कशी मारली रेड, कोणी ओळखले?
- अशी माहिती आहे, की पेशावरमधून मिळालेल्या इनपूटच्या आधारावर रेड टाकण्यात आली.
- अझहरची ओळख पटवण्यासाठी त्याच्या कुटुंबातील काही लोकांना सोबत घेतले होते.
3 - आता कुठे आहे अझहर?
- पाकिस्तानी वृत्तपत्र द न्यूज्या वृत्तानुसार, अझहरला एका गुप्त ठिकाणी नेण्यात आले आहे.
- पाकिस्तानी अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.
- काही पाकिस्तानी मीडिया या कारवाईला प्रायव्हेट कस्टडी देखिल म्हणत आहे.
4 - पठाणकोट एअरबेस हल्ल्यात काय आहे अझहरची भूमिका?
- एअरबेसवर हल्ला करणारे दहशतवादी सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून पाकिस्तानातील बहावलपूर येथे बसलेल्या त्यांच्या उस्तादांना प्रत्येक घडामोडीची माहिती देत होते.
- एअरबेसवर हल्ला करणाऱ्यांनी ज्या क्रमांकाशी संपर्क केला होता, ते पाकिस्तानातील होते.
- अशीही माहिती मिळत आहे, की हल्ला करण्यापूर्वी अझहरने एका मोठ्या रॅलीला संबोधित केले होते.त्यात त्याने भारताविरोधात जिहाद सुरु करण्याची घोषणा केली होती.
5 - पाकिस्तानात अझहर कुठून करतो काम?
- अझहरचा अड्डा पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे आहे. तिथेच जैशच्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिले जाते.
- 2014 मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणेने अलर्ट दिला होता, की अझहर पुन्हा एकदा विमान अपहरणाचा कट रचत आहे.
- त्याचवेळी दिल्लीतील मेट्रोलाही अलर्ट देण्यात आला होता.
6 - अझहरवर पाकिस्तानात खटला चालणार?
- याची जास्त शक्यता नाही. कारण मुंबई हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत पाकिस्तानने लष्कर-ए-तोएबाचा कमांडर जकी-उर-लखवीला अटक केली होती, मात्र त्याला कडक शासन ते करु शकले नाही.
- 26/11 प्रकरणासाठी पाकिस्तानात स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल कोर्टात फारकाही झाले नाही. न्यायाधीशांची नियुक्ती मात्र वेळोवेळी होत राहिली आणि सुनावणी टळत राहिली.

7 - ज्या समितीती आयएसआय आणि पाकिस्तान मिलिटरीचे अधिकारी, ते तपास करु शकतील ?
- नवाज शरीफ यांनी एक चौकशी समिती स्थापन केली आहे. ती पठाणकोट हल्ल्याचे पुरावे आणि आरोपींची चौकशी करणार आहे.
- या समितीमध्ये प्रशासनातील आणि संरक्षणातील बडे अधिकारी आहेत. यात काउंटर टेररिझम डिपार्टमेंटचे आयजी, अॅडिशनल आयएसआयचे ब्रिगेडियर नोमान सईद आणि मिलिटरी इंटेलिजेन्सचे लेफ्टनंट कर्नल इरफान मिर्झा आहेत.
- या कमिटीकडून फार आशा बाळगता येणार नाही, कारण आयएसआय कायम भारताविरोधात दहशतवाद्यांना मदत करत आले आहे.

8 - काय होते कंदहार विमान अपहरण आणि भारताने किती दहशतवादी सोडले होते?
- 24 डिसेंबर 1999 रोजी पाच सशस्त्र दहशतवाद्यांनी 178 प्रवाशी असलेले इंडियन एअरलाइन्सचे आयसी - 814 विमान हायजॅक केले होते.
- हायजॅक करण्यात आलेले विमान अमृतसर, लाहोर आणि दुबई मार्गे अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर उतरवण्यात आले होते.
- दुबईत काही प्रवाशांना सोडून देण्यात आले होते.
- 25 वर्षांचा भारतीय नागरिक रुपिन कात्याल याचा मृतदेह विमानातून बाहेर फेकण्यात आला होता.
- दहशतवाद्यांनी भारत सरकार समोर 178 प्रवाशांच्या मुक्ततेसाठी तीन दहशतवाद्यांच्या सुटकेचा प्रस्ताव ठेवला होता.
- अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातील तत्कालिन सरकारने प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तीन दहशतवाद्यांना सोडले होते. त्यापैकीच एक होता मौलाना मसूद अझहर.
या दहशतवाद्यांना सोडले
- मौलाना मसूद अझहर, मुश्ताक अहमद जरगर आणि अहमद उमर सईद शेख.
- मसूद अझहरने 2000 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली.

9- सुटकेनंतर अझहरने काय केले ?
- सुटकेनंतर अझहर तालिबान्यांच्या मदतीने अफगाणिस्तान मार्गेत पाकिस्तानात पोहोचला होता. त्याने काश्मीरमध्ये भारतासोबत लढण्यासाठी जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली.
- पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय जैशच्या दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप होत असतो.
- 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अझहर प्रमुख संशयित होता.
- गुप्तचर यंत्रणांचा दावा आहे, की पाकिस्तानी मिलिटरी अझहर सारख्यांना कायम सांभाळत असतात आणि गरज असेल तेव्हा त्यांना भारताविरोधात लढण्यासाठी पुढे करतात. त्यांना कायम कट्टरपंथीसारखे प्रोजेक्ट केले जाते, ज्यामुळे कारवाईची वेळ आली तर ती टाळता येते.
10 - नवाज शरीफ यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात काय म्हटले?
- पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या बैठकीला नवाज शरीफ सरकारमधील मंत्री, पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री, परराष्ट्र व्यवहार सल्लागार, 'आयएसआय'चे डायरेक्टर जनरल, लाहोर कॉर्प्स कमांडर, डीजी इंटेलिजेंस आणि मिलिटरी पोलिससह आणखी काही बडे अधिकारी उपस्थित होते.
- बैठकीत पाकिस्तानमधून दहशतवाद संपवण्यावर आणि पठाणकोट हल्ल्याशी संबंधित लोकांवर योग्य कारवाई करण्यावर चर्चा झाली.
- जैश-ए-मोहम्मदविरोधात मिळालेल्या पुराव्यानुसार या संघटनेचे अनेक कार्यालय सील करण्यात आले असून कारवाई सुरु आहे.
- पाकिस्तान सरकार एक विशेष तपास पथक (SIT) पठाणकोटला पाठवणार आहे, जे तपासात भारताला सहकार्य करेल.
- पठाणकोट हल्ल्याच्या तपासात पाकिस्तान भारताला पूर्ण सहकार्य करेल.