आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहियांनी मुलायम यांची हकालपट्टी केली असती, वाढदिवशी मायावतींचा घणाघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशातील सत्ताधारी समाजवादी पार्टीचे काम समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी घालून दिलेल्या तत्त्वाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, असा घणाघात बसपच्या नेत्या मायावती यांनी शुक्रवारी केला. एवढेच नव्हे, तर लोहिया हयात असते तर त्यांनी सपा प्रमुख मुलायम सिंह यादव यांची समाजवाद्यांच्या यादीतून हकालपट्टी केली असती, असे मायावती यांनी सुनावले. शुक्रवारी आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

माझा वाढदिवस जन कल्याणकारी दिवस म्हणून साजरा होत अाहे. त्यासाठी गरीब आणि गरजूंना मदत करण्यात आली. परंतु मुलायम यांच्या वाढदिवशी मात्र सार्वजनिक पैशांची उधळपट्टी करण्यात आली. मुलायम यांनी लोहियांच्या तत्त्वांना हरताळ फासला आहे. आज लोहिया हयात असते तर त्यांनी मुलायम यांची समाजवाद्यांच्या यादीतून हकालपट्टीच केली असती. दुसरीकडे यूपी सरकारने शेतकऱ्यांसाठी काेणत्याही कल्याणकारी योजना राबवलेल्या नाहीत. राज्यातील ५० जिल्ह्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत सरकारने जनतेचा विचार करून मदत करण्याऐवजी उधळपट्टी केली जात आहे. सैफई महोत्सवावर ही उधळण होत आहे. सत्ताधारी सरकारचे हे वर्तन सामान्य माणसांच्यादेखील विरोधात जाणारे आहे. लोहियांच्या नावाखाली समाजवादी पार्टीने दलित, मागासवर्गीय समुदायांवर अन्याय केला. परंतु आम्ही हे सहन करणार नाहीत. योग्य वेळ आल्यानंतर त्याचे चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा मायावती यांनी दिला.

निवडणुकीमुळे राम मंदिर मुद्दा
राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भाजपने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा काढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार आणि दिल्लीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘नाटके’ केली होती. त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता. त्याच प्रमाणे उत्तर प्रदेशातील मतदारही या गोष्टींना भुलणार नाहीत, असा दावा मायावतींनी केला. राम मंदिराचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. त्यांनी धार्मिक भावनांच्या साह्याने मतदारांना आकर्षित करू नये. कारण मतदार त्याला दाद देणार नाहीत.परंतु मतदारांनी सावध राहण्याची गरज आहे, असे मायावती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कायद्याचे धिंडवडे
सपाच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सामान्य नागरिक सपा सरकार म्हणजे माफिया आणि गुंडांचे असल्याचे म्हणू लागला आहे. परंतु आमच्या पक्षाचे सरकार आल्यास सुशासन मिळेल याची खात्री जनतेला पटली आहे, असा दावा मायावती यांनी केला.

विधानसभेच्या तोंडावर विस्ताराची योजना
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर बसपने आपल्या संघटनात्मक विस्ताराची योजना तयारी केली आहे. जेणेकरून त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा पराभव करणे शक्य होऊ शकेल.

ही विधेयके मंजूर करा
केंद्र सरकार दलित, मागासवर्गीयांच्या बाजूने काम करत असल्याचे दाखवते; परंतु प्रत्यक्षात काहीही केले जात नाही. सरकारने पदोन्नतीमध्ये आरक्षण, गरिबांसाठी राखीव जागा, स्थलांतरित, गरीब किंवा उच्चवर्णीयातील गरिबांना संधी देणारी घटना दुरुस्ती करून दाखवावी. ही विधेयके केंद्र मंजूर करायला हवीत.