आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे नामंजूर होऊ शकतो मायावतींचा राजीनामा, लालू म्हणाले, आम्ही बिहारमधून राज्यसभेवर पाठवू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या वरिष्ठ सभागृहात दलितांवरील अत्याचारावर प्रश्न विचारु दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या मायावती यांनी मंगळवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राज्यसभा सचिवालयाच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, राजीनामा स्वीकारण्याचा अंतिम अधिकार सभापतींना असतो. खासदारांच्या राजीनाम्याचा तयार फॉर्मेट असतो, त्यानुसार कमीत कमी शब्दांमध्ये त्यांनी राजीनामा पत्र लिहिले पाहिजे. त्यात राजीनाम्याच्या कारणाचा उल्लेक केला नाही पाहिजे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी तीन पानी राजीनामा पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी मंगळवारी सकाळी राज्यसभेत काय-काय झाले याचा सविस्तर वृत्तांत लिहिला आहे. राजीनामा निर्धारित फॉर्मेटमध्ये नसल्याने तो नामंजूर होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे, राजीनामा मंजूर झाल्यास मायावतींना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी आरजेडी चीफ लालू प्रसाद यादव यांनी दाखवली आहे. 
 
मंगळवारी सभागृहात काय झाले... 
 - सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरु झाल्याबरोबर मायावतींनी नोटीस देऊन आपले मुद्दे मांडण्यासाठी परवानगी मागितली. राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांनी 3 मिनिटांचा वेळ दिला.
 - मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि सहारनपूरमध्ये दलितांवर होत असलेल्या अत्याचारावर बोलण्यास सुरुवात केल्याबरोबर भाजप सदस्यांनी त्यांना रोखण्यासाठी गोंधळ सुरु केला. 
 - मला बोलू द्या, माझे म्हणणे मांडू द्या, असे मायावती म्हणत असतानाच जवळपास 7 मिनिटे भाजप सदस्यांचा गोंधळ सुरु होता. दरम्यान मायावतीही तेवढा वेळ या गोंधळात बोलत होत्या. 
 - त्यातच तुमचा तीन मिनिटांचा वेळ संपला आहे, असे सांगत उपसभापती कुरियन यांनी मायावतींना बसण्यास सांगितले. त्यानंतर त्या संतप्त झाल्या. 
 - 'मी सभागृहात दलितांचे प्रश्न मांडू शकत नसेल, दलितहिताचे मुद्दे उपस्थित करु शकत नसेल तर माझा राज्यसभेत राहाण्यात काय अर्थ आहे. मी माझ्या समाजाचे संरक्षण करु शकत नाही. मला माझे म्हणणे मांडू देण्याची संधी दिली जात नसेल तर मला सभागृहात राहाण्याचा अधिकार नाही. मी राज्यसभेचा राजीनामा देत आहे.' असे म्हणत मायावती सभागृहातून बाहेर पडल्या. 
 - सायंकाळी त्यांनी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, जे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत त्यांची भेट घेऊन राजीनामा सोपवला. 
 
काँग्रेस-तृणमूलचाही सभात्याग 
- त्यानंतर कुरियन यांनी चर्चेसाठी विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद यांचे नाव पुकारले. आझाद म्हणाले, 'सर्वपक्षिय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधीपक्ष नेत्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल असा विश्वास व्यक्त केला होता. देशहितासाठी सरकारला वेळोवेळी सहकार्य करण्याची विरोधकांची नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र अशापद्धतीच्या वातावरणात काम होऊ शकत नाही. आम्ही सभात्याग करतो.'
 - यानंतर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला. 
 - बसपाचे सतीशचंद्र मिश्रा हे देखील मायावती यांच्यासोबत सभागृहातून बाहेर पडले. मात्र ते लवकरच परत आले. त्यानंतर बसपा सदस्यांनी 'दलित हत्या बंद करा' अशी घोषणाबाजी केली. समाजवादी पक्षानेही त्यांना साथ दिली. 
 
लालू म्हणाले - आम्ही मायावतींना राज्यसभेवर पाठवू 
 - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मायावती यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी दाखवली आहे. 
 - लालू यादव म्हणाले, 'मायावती या गरीब आणि दलितांच्या नेत्या आहेत. सहारनपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराला त्या सभागृहात वाचा फोडू इच्छित होत्या. मात्र भाजप सदस्यांनी एकत्र येऊन त्यांना रोखण्याच प्रयत्न केला. त्यांना बोलूच दिले गेले नाही. यामुळे नाराज होऊन त्यांनी राजीनामा दिला आहे. त्या, जे काही बोलल्या ते योग्यच आहे, ज्या ठिकाणी दलित आणि मागास घटकांबद्दल बोलूच दिले जात नसेल तिथे राहाण्यात काय अर्थ आहे? मायावतींविरोधात ज्या पद्धतीने सभागृहात भाजप सदस्य वागले त्यावरुन स्पष्ट होते की भाजप दलित विरोधी पक्ष आहे.'
 
पुढील स्लाइडवर वाचा मायावतींचा तीन पानी राजीनामा...