आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात एमबीबीएसच्या तीन हजार जागा वाढणार , केंद्राचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशातील डॉक्टरांचा तुटवडा भरून काढण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील मेडिकलच्या जागा वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील ग्रामीण भागात डॉक्टरांची सेवा विस्तारण्याच्या उद्देशाने वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण 3000 जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारने जवळपास 7000 कोटी रुपये खर्चाची एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे.


यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच कॅबिनेटपुढे मांडला जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, देशात एकूण 168 सरकारी वैद्यकीय महाविद्यालये असून त्यात 20 हजार 574 जागा उपलब्ध आहेत. त्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे, परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांचा तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने 7000 कोटी रुपये खर्च करून एक योजना तयार केली आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, 2017 पर्यंत सध्याच्या महाविद्यालयांत जवळपास 3000 नव्या जागा निर्माण केल्या जाणार आहे. एका अन्य अधिका-याने सांगितले की, याअंतर्गत ज्या महाविद्यालयांतील जागा सध्या 50 ते 100 आहेत, अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणच्या जागा वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) नियमानुसार त्या वैद्यकीय महाविद्यालयांतील पायाभूत सुविधा वाढवण्यात येतील. नव्या जागांची निर्मिती ही छोट्या महाविद्यालयांतच केली जाईल. त्यासाठी केंद्र सरकार 75 टक्के करणार असून 25 टक्के निधी हा राज्य सरकारला करावा लागणार आहे. देशात एकूण 362 सरकारी व खासगी महाविद्यालये असून तेथून दरवर्षी 45 हजार 65 एमबीबीएस डॉक्टर तयार होऊन बाहेर पडतात.


डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज कशासाठी?
देशात आजघडीला 6 लाख एमबीबीएस डॉक्टर आहेत. सध्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रति दोन हजार लोकांमागे एक डॉक्टर असे हे व्यस्त प्रमाण आहे. वाढती लोकसंख्या व आजारांचे प्रमाण लक्षात घेता 2020 पर्यंत भारतात चार लाख अतिरिक्त डॉक्टर लागणार आहेत. स्वीडन व इंग्लंड हे त्यासाठी चांगले देश आहेत. स्वीडनमध्ये हजार लोकांमागे तीन, तर ब्रिटनमध्ये दोन हजार रुग्णांमागे पाच डॉक्टर उपलब्ध आहेत.