आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅकडोनाल्ड्स- विक्रम बक्षी भागीदारीचा वाद शिगेला; लवादातही तोडगा नाहीच |

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतातील व्यवसायाचा विक्रम बक्षी यांच्याशी असलेला भागीदारीचा वाद सोडवता येणार नाही, असे मॅकडोनाल्ड्स या फास्ट फूड चेन कंपनीने बुधवारी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलएटी) स्पष्ट केले आहे. बक्षी  व मॅकडोनाल्डसने वाद आपसांत मिटवण्याचा सल्ला एनसीएलएटीने मागच्या आठवड्यात दिला होता. 

दरम्यान, आता दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात याचिका (क्रॉस पिटिशन) दाखल केल्या आहेत. यामुळे या याचिकांना एका आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश लवादाने दिले आहे.  विक्रम बक्षी  आणि मॅकडोनाल्ड्स यांच्या संयुक्त भागीदारीत सीपीआरएल कंपनीच्या माध्यमातून उत्तर आणि पूर्व भारतात  १६९ आऊटलेट्स चालवले जात होते. 

सुनावणीवेळी मॅकडोनाल्ड्सचे वकील राजीव नायर म्हणाले की,  कंपनीचा कॅनॉट प्लाझा रेस्टॉरंट लिमिटेड (सीपीआरएल) या फ्रँचायझी पार्टनरशी असलेला वाद सोडवणे आता शक्य नाही. मागील काही आठवड्यांत सीपीआरएलमधून बरीच रक्कम काढण्यात आली आहे. दरम्यान, बक्षी  हा वाद सोडवण्यास तयार आहेत, पण मॅकडोनाल्ड्स नाही, असे बक्षी यांचे वकील मनू सिंघवी यांनी म्हटले आहे. 

त्यावर मॅकडोनाल्ड्सच्या संचालकांकडून बाजू मांडणारे वकील सुदीप्तो सरकार म्हणाले की, ‘विक्रम बक्षी  यांच्या कामाच्या पद्धतीमुळे वादावर तोडगा निघण्याचा प्रश्नच उद््भवत नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही ते संचालक मंडळाची बैठक घेण्याचा घाट घालत आहेत.’ दरम्यान, या प्रकरणात शांततेत तोडगा निघण्याची काहीच अाशा नसल्याचे एनसीएलएटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. जे. मुखोपाध्याय यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ सप्टेंबर निश्चित केली आहे.

बक्षींच्या नियुक्तीचा  सुमारे चार वर्षे जुना वाद
अमेरिकी कंपनी मॅकडोनाल्ड्स व सीपीआरएल यांचा ४ वर्षांपासून वाद सुरू आहे. मॅकडोनाल्ड्सने ऑगस्ट २०१३ मध्ये बक्षी यांना सीपीआएलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवले होते. बक्षी यांनी यास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादात आव्हान दिले होते. लवादाने यंदा १४ जुलै रोजी बक्षी यांना व्यवस्थापकीय संचालकपद बहालीचे आदेश दिले. मॅकडोनाल्ड्सने यास अपिलीय लवादात आव्हान दिले आहे.याप्रकरणी निर्णय झालेला नाही.

चर्चेने वाद सोडवण्याचा लवादाचा सल्ला
दोघांनी ३० ऑगस्टपर्यंत हा वाद चर्चेने सोडवण्याचा सल्ला लवादाने २५ ऑगस्ट रोजी दिला होता. २१ ऑगस्ट रोजी मॅकडोनाल्ड्सने सीपीआरएलसोबतचा फ्रँचायझी करार रद्द केला होता. करारातील अटींचे उल्लंघन व देयकांच्या थकबाकीचाही आरोप होता. सीपीआरएल ६ सप्टेंबरपर्यंत मॅकडोनाल्ड्सचे नाव व ट्रेडमार्क वापरू शकते, असेही मॅकडोनाल्ड्सने म्हटले होते. 
बातम्या आणखी आहेत...