नवी दिल्ली - शास्त्रीय गायिका बेगम अख्तर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त चलनी नाण्यांचे प्रकाशन करण्यात आले आहे. १०० व ५ रुपयांची नाणी यानिमित्त तयार करण्यात आली आहेत. गझलसम्राज्ञी व शास्त्रीय गायिका बेगम अख्तर यांच्या जन्मशताब्दी वर्षात विविध शहरांत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन सरकारने केले आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांनी नुकतेच जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांचे औपचारिक उद्घाटन केले आहे. यानिमित्त संगीत नाटक अकादमीच्या माध्यमातून वार्षिक स्कॉलरशिपही जाहीर करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रात करिअर करणा-या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाईल. उत्तर प्रदेशातील फाझियाबाद येथे ७ ऑक्टोबर १९१४ रोजी बेगम अख्तर यांचा जन्म झाला होता.
पटियाला घराण्याचे अत्ता मोहंमद खान यांच्याकडे त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. किराणा घराण्याची गायकी त्यांनी अब्दुल वाहिद खान यांच्याकडून आत्मसात केली. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांनी गायकीला सुरुवात केली होती. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची जाणीव व स्मरण करण्यासाठी केंद्र सरकार विविध संगीत कार्यक्रमांद्वारे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितले.