नवी दिल्ली- महाराष्ट्रातील नाशिक, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांतील 13 मुलांचे अपहरण करून त्यांच्यापैकी 9 मुलांची हत्या करणार्या क्रूरकर्म्या बहिणी सीमाबाई शिंदे आणि रेणुका शिंदे यांची दया याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे त्यांना फाशीच होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यासह निठारी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोली व अन्य तीन आरोपींच्या दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्या आहेत.
केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी या आरोपींच्या दया याचिका फेटाळल्या आहेत. महाराष्ट्रातील असरा गावातील रेणुका व सीमा या दोन बहिणींची दया याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली. सीमा आणि रेणुकाबाई या दोन बहिणींनी आई तसेच मित्र किरण शिंदे यांच्यासोबत 1990 ते 1996 दरम्यान पुणे, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांतील 13 मुलांचे अपहरण केले होते. त्यांना त्या भीक मागायला तसेच मंगळसूत्र चोरणे पाकीट मारायला भाग पाडत असत. त्यांना उपाशी ठेवणे, बांधून ठेवणे असे अत्याचारही त्यांनी केले. कामाला नकार देणार्या 9 जणांची हत्या केली होती. पैकी काहींना त्यांनी भिंतीवर आपटून, विजेचा शॉक देऊन मारले होते. मात्र त्यांच्याविरोधात केवळ 5 हत्यांचेच पुरावे होते. त्यात दोन्ही बहिणींना 2001 मध्ये फाशीची शिक्षा झाली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2006 शिक्कामोर्तब केले होते.
अन्य एक आरोपी राजेंद्र वासनिक याची याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली आहे. त्याच्या फाशीच्या शिक्षेवर ऑक्टोबर 2012 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्याच्यावर अत्याचार व हत्येचा आरोप होता. मध्य प्रदेशातील जगदीशला पत्नी व पाच मुलांच्या हत्येप्रकरणी फाशी झाली होती, तर आसामातील होलीराम बोरदोलोईला तीन भावांची हत्याप्रकरणी फाशी झाली होती. त्यांची याचिकाही राष्ट्रपतींनी फेटाळली.
० दोन बहिणींवर 9 मुलांच्या हत्येचा आरोप
० सत्र न्यायालयाने 28 जून 2001 मध्ये दिली होती फाशी
०आई अंजनाबाईचा तुरुंगात मृत्यू, रेणुकाचा पती किरण शिंदे माफीचा साक्षीदार.
(फोटो: आरोपी बहिणी सीमाबाई शिंदे आणि रेणुका शिंदे)
पुढील स्लाइड्सवर वाचा, सुरेद्र कोलीलाही मृत्यूदंड...