आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्परांच्या लष्करी तळांचा वापर करणार, भारत-अमेरिका यांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये झाली सहमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि अमेरिका लवकरच परस्परांच्या लष्करी तळांचा वापर करू शकतील. दोन्ही देशांची लढाऊ विमाने आणि युद्धनौकाही परस्परांच्या लष्करी तळावर तैनात केल्या जाऊ शकतील. दोन्ही देश परस्परांकडे उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करू शकतील. तसेच लष्करी साहित्यही वापरू शकतील.

भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांच्यात मंगळवारी यासंदर्भात चर्चा झाली. तत्पूर्वी दोन्ही देशांच्या प्रतिनिधी मंडळातही चर्चा झाली. या वेळी या मुद्द्यावर सहमती झाली. यूपीए सरकारच्या कार्यकाळात सहमती होऊ शकली नव्हती. याबाबतचा करार काही आठवड्यांत किंवा कदाचित काही महिन्यांत होऊ शकतो, असे संकेत पर्रीकर यांनी दिले. याबाबत अधिक माहिती देताना पर्रीकर म्हणाले की, मानवी दृष्टिकोनातून मदत देण्याच्या वेळी विमानांना इंधन भरावे लागते. अशा वेळी लष्करी तळांचा वापर केला जाईल. यासंदर्भात त्यांनी नेपाळमधील भूकंपाच्या वेळी अमेरिकेने केलेल्या मदत कार्याचे उदाहरण दिले. लष्करी तळाचा वापर करू दिल्यास त्याकडे लष्करी आघाडी अशा दृष्टिकोनातून पाहिले जाईल, असे भारताला वाटत होते. पण आता संबंधित घटनेवरून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

दोन्ही देशांच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांमध्ये आता सुरक्षेसंदर्भात नियमित द्विपक्षीय चर्चा होईल. नौदलाशी संबंधित प्रश्नांवरील द्विपक्षीय चर्चा आणखी भक्कम करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. कार्टर यांनी सांगितले की, संरक्षण व्यापार आणि तंत्रज्ञान पुढाकारानुसार नव्या प्रकल्पांबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
उत्तम समन्वय राहण्याची अपेक्षा
या करारामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात उत्तम समन्वय राहील, अशी अपेक्षा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या करारामुळे इंधन विक्रीही सोपी होईल तसेच भारताला संरक्षण साहित्याचे सुट्या भागांचा पुरवठाही सहजपणे करता येईल. सागरी सीमांचे संरक्षण महत्त्वाचे असून त्याबाबतही दोन्ही देशांत सहमती झाली आहे.

चीनची वाढती ताकद रोखण्याचा प्रयत्न
अमेरिका हिंदी महासागर व आशिया-प्रशांत भागात चीनची वाढती ताकद रोखण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे तो देश भारताची मदत घेत आहे. चारी बाजूंनी घेरले जात असल्याने भारतही मोठ्या देशाच्या लष्कराची मदत असावी, अशी इच्छा बाळगून आहे. अमेरिका हिंदी महासागरात व आशिया-प्रशांत भागात नौसेनेतील ६० टक्के लढाऊ नौका तैनात करणार आहे.