आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Military Chief DalbeerSingh News In Marathi, V K Singh

वादावर पडदा: संरक्षणमंत्र्यांची घोषणा, व्ही. के. सिंहांवर विरोधकांचे शरसंधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीबाबत सुरू झालेला वाद संपुष्टात आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.‘मागच्या यूपीए सरकारने काही आठवड्यांपूर्वीच लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. विद्यमान सरकारलाही तो निर्णय मान्य आहे. त्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज नाही’, असे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी राज्यसभेत दिले. तत्पूर्वी काँग्रेस नेत्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात मोदी सरकारमधील मंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंह यांच्यावर शरसंधान केले. सिंह यांचे ट्विट भारताचे लष्कर आणि नवे लष्करप्रमुख या दोघांचाही अपमान करणारे आहे, अशी टीका करत सिंह यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.

लोकसभेत काँग्रेसचे अमरिंदर सिंग आणि राज्यसभेत आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उचलून धरला. दोघांनीही परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मंत्र्यांनी केलेले विधान लष्कराचे मनोधैर्य खच्ची करणारे असल्याचे आनंद शर्मा म्हणाले. जदयू, बसपानेही त्यांना पाठिंबा दिला. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नवीन लष्करप्रमुखांच्या नियुक्तीच्या निर्णयाचा फेरविचार व्हायला हवा, अशी मागणी केली. ती फेटाळताना देशात काही मुद्दे पक्षीय राजकारणापासून वेगळे ठेवण्याची परंपरा असून विरोधकांनी परिपक्वता दाखवावी, असे जेटली म्हणाले.

असा आहे मुख्य वाद
यूपीए सरकारने लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग यांची नव्या लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ते 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत असलेले जनरल विक्रम सिंह यांची जागा घेतील. मात्र या निर्णयाला लेफ्टनंट जनरल रवी दास्ताने यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्यावर गंभीर आरोप होते. माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी 2012 मध्ये त्यांच्यावर निर्बंध लादले होते, अशावेळी त्यांना पदोन्नती देणे चुकीचे असल्याचे दास्ताने यांचे म्हणणे आहे, परंतु या प्रकरणी सरकारने न्यायालयात शपथपत्र दाखल करून वेगळी भूमिका घेतली. तत्कालीन लष्करप्रमुखांनी लेफ्टनंट जनरल सुहाग यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर, अवैध आणि पूर्वनियोजित होती, असे सरकारने शपथपत्रात म्हटले आहे. त्यावर व्ही. के. सिंह यांनी ट्विट करून कारवाई उचित असल्याचे म्हटले होते.

व्ही. के. सिंहांच्या या ट्विटवरून वादंग
‘एखादी फलटण निष्पापांना मारत असेल, दरोडे टाकत असेल आणि तिचा प्रमुख तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर आरोप लावले जाऊ नये का? गुन्हेगारांना सोडून द्यायचे का?’

शपथपत्राबाबत जेटलींनी मागितले स्पष्टीकरण
हा वाद सुरू असतानाच संरक्षणमंत्र्यांनी आपल्या मंत्रालयाने सर्वोच्च् न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्राबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण सचिव आर. के. माथूर हे लवकरच याबाबत स्पष्टीकरण देणार आहेत. संरक्षणमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दल न्यायाधिकरणामध्ये दाखल केलेलेच शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.