नवी दिल्ली - राष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु आहे. त्यासोबत विविध पक्षांच्या नेत्यांचे वक्तव्यही समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एनडीए उमेदवार रामनाथ कोविंद हेच विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'हे काही रॉकेट सायन्स नाही. कोविंद हेच विजयी होणार आहेत.' पटेल यांच्या पक्षाने यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांना पाठिंबा दिलेला आहे. असे असताना पटेलांनी विरोधी गटाच्या उमेदवाराच्या विजयाची भाकित वर्तवण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या आमदारांना आपल्या सद्सद विवेक बुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. एनडीएने कोविंद यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला आहे तर, बसपा प्रमुख मायावती म्हणाल्या की राष्ट्रपती तर दलितच होणार.
कोणते नेते काय म्हणाले
- प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस)
- राष्ट्रपती पदाची निवडणूक कोण जिंकणार हे सांगण्यासाठी रॉकेट सायन्स आले पाहिजे असे काही नाही. एनडीएचे रामनाथ कोविंद विजयी होणार यात काही शंका नाही. हे मी यासाठी म्हणत आहे कारण खासदार-आमदार हे आपल्या विवेकाने मतदान करतील असे काही नाही. त्यांना पक्षाच्या धोरणानुसारच मतदान करावे लागते.
अरविंद केजरीवाल (आम आदमी पार्टी)
- आमचे मीरा कुमार यांना समर्थन आहे. सर्वांनी आपापल्या सद्सदविवेक बुद्धीला स्मरुन मतदान केले पाहिजे. लोकशाहीमध्ये सर्वाधिक मते ज्यांना असतात ते विजयी होतात.
कपिल मिश्रा (आप मधून निलंबित मंत्री)
- माझे मत त्यांनाच आहे जे राष्ट्रपती होणार.
रणदीपसिंह सुरजेवाला (काँग्रेस प्रवक्ते)
- ही राष्ट्रपती निवडणूक दोन गोष्टींसाठी महत्त्वाची आहे. एक लोकशाही विचारधारा कायम ठेवणे आणि दुसरे म्हणजे विचारांचा हा संघर्ष आहे.
मायावती (बसपा प्रमुख)
- कोण जिंकणार याने काही फरक पडत नाही. मात्र एक दलित राष्ट्रपती होणार हे निश्चित आहे.
आदित्यनाथ योगी (मुख्यमंत्री उत्तर प्रदेश )
- उत्तर प्रदेशसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. राज्याचा एक सुपूत्र देशाचा राष्ट्रपती होणार आहे.
व्यंकय्या नायडू (केंद्रीय मंत्री)
- रामनाथ कोविंद हे सहज आणि सन्मानजनक मतांनी विजयी होतील.
हेही वाचा...