आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी संघटनांचे आर्थिक स्रोत बंद करा, सीबीआयच्या परिषदेत मोदींनी मांडला मुद्दा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दहशतवाद्यांचे आर्थिक स्रोत बंद करण्याच्या दृष्टीने विशेष आर्थिक निर्बंधांची गरज प्रतिपादित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसवर झालेला दहशतवादी हल्ला हे या अनुषंंगाने जिवंत उदाहरण असल्याचे नमूद केले. जगभरातील कारवायांसाठी पैसा उभा करण्याच्या दृष्टीने दहशतवाद्यांनी वाटेल ते करण्याची प्रचंड लवचिकता दाखवली असल्याचे मोदी म्हणाले.
सीबीआय तसेच राज्य भ्रष्टाचारविरोधी व दक्षता विभागांच्या २१ व्या परिषदेत मोदी बोलत होते. या परिषदेला जगभरातील ३३ देशांच्या गुप्तचर विभागातील प्रतिनिधी उपस्थित आहेत. मोदी म्हणाले, ‘मादक पदार्थांची तस्करी, बँकांवरील दरोडे, नकली नोटा इथपासून अगदी वाहन चोरीपर्यंतचे उद्योग करत दहशतवादी पैसा उभा करतात. दहशतवाद्यांचे हेच स्रोत बंद केले तर त्यांची नाडी आवळली जाऊन हल्ले करण्याची क्षमताही कमी होईल.’ पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक देशांचे प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहू शकले नाहीत. जागतिकीकरण व आिर्थक उदारीकरणामुळे गुन्हेगारीतून निर्माण होत असलेला पैसा जगात कुठेही वापरण्याच्या दहशतवाद्यांच्या क्षमतेत वाए झाल्याचे मोदी म्हणाले.

जागतिक सहकार्य आवश्यक
गुन्हेगारीविरुद्धच्या लढाईत गुन्हेगारीतून येणारा पैसा थांबवणे महत्त्वाचे आहे. यासाठी जागतिक सहकार्याची गरज मोदी यांनी प्रतिपादीत केली. सध्या संघटित गुन्हेगारी जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी एक मोठे आव्हान असल्याचे नमूद करून चोरीचा पैसाच प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशाला बाहेरचा मार्ग दाखवतो, असे ते म्हणाले.
११ अधिकाऱ्यांचा पदकांनी सन्मान
पंतप्रधानांच्या हस्ते या परिषदेत अकरा सीबीआय अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल विशेष सेवापदके प्रदान करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे परिषदेस उपस्थित असलेल्या मान्यवरांनी कौतुक केले. यात गुजरातचे आयपीएस ए. के. शर्मा यांचा समावेश आहे.
काळा पैसा : माहितीची देवाण-घेवाण आवश्यक
काळ्या पैशाचा शोध घेण्याच्या दृष्टीने माहितीची देवाण-घेवाण अत्यंत आवश्यक असून त्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे मोदी यांनी या वेळी नमूद केले. करचोरीच्या माध्यमातून कमावलेला पैसा कुणी, कुठे दडवून ठेवला आहे याची माहिती या माध्यमातून बाहेर येईल, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर लढाई गरजेची
आज भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर लढाईची गरज आहे. भारताने विशेषत: भाजप सरकार सत्तेत आल्यापासून काळा पैसा व भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर पावले उचलली असल्याचे मोदींनी नमूद केले. काळ्या पैशासंबंधीची माहिती परस्परांना देता यावी यासाठी अगदी कमी काळात महत्त्वपूर्ण पावले उचलून अनेक देशांशी यासंंबंधीचे करार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
इंटरपोलशी समन्वय
आपल्यावर असलेली जबाबदरी अधिक कार्यक्षमतेने पार पाडण्याच्या दृष्टीने सीबीआय इंटरपोलशी सातत्याने समन्वय राखून आहे. यामुळे आर्थिक गुन्हे लपून राहणार नाहीत.
अनिल सिन्हा, सीबीआय संचालक
संस्थांमध्ये एकी हवी
पॅरिसवर नुकताच झालेला हल्ला असो अथवा, २००८ मधील मुंबई हल्ला असो, मानवतेविरुद्धचे हे हल्ले रोखण्यासाठी गुप्तचर संस्थांनी एकत्रपणे लढले पाहिजे.
जर्गन स्टॉक, इंटरपोलचे सरचिटणीस