आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्ल्या, ललित मोदीच्या प्रत्यार्पणासाठी मदत करा- मोदी, ब्रिटनच्या पंतप्रधानांची घेतली भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅम्बर्ग (जर्मनी)- जी-२० देशांच्या परिषदेनिमित्त जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली. भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून ब्रिटनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्यास   भारताच्या ताब्यात द्यावे म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन मोदींनी या वेळी केले.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. विजय मल्ल्यासह इतर आरोपी व्यापाऱ्यांच्या प्रत्यार्पणात सहकार्य करण्याचे आवाहन मोदींनी केल्याचे टि्वटमध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय मोदींनी इटली, दक्षिण कोरिया या देशांच्या नेत्यांशी चर्चा करून द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने सहकार्याबाबत चर्चा केली.
 
गेल्या फेब्रुवारी महिन्यात भारताने मल्ल्यास आपल्या ताब्यात द्यावे म्हणून ब्रिटनकडे विनंती केली होती. त्यानंतर मार्चमध्ये अरुण जेटली यांनी लंडनमध्ये थेरेसा मे यांची राजशिष्टाचार न पाळता भेट घेतली होती. मल्ल्यास भारताकडे सोपवण्याबाबत दोन्ही देशांत झालेली ती पहिली चर्चा होती. मात्र, अजूनही भारताच्या हाती ठोस काहीही लागलेले नाही.
 
मल्ल्यावरील कर्जाचा डोंगर
३१ जानेवारी २०१४ पर्यंत किंगफिशर एअरलाइन्स या मल्ल्याच्या कंपनीवर बँकांचे ६,९६३ कोटींचे कर्ज थकीत होते. या कर्जावरील व्याज व इतर शुल्कासह ही रक्कम ९ हजार कोटींच्या घरात गेली आहे.

मल्ल्या सध्या जामिनावर
विविध बँकांकडून सुमारे ९ हजार कोटी रुपये कर्ज घेऊन ब्रिटनमध्ये पळालेला मल्ल्या १३ जून रोजी वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटसमोर हजर झाला होता. तेव्हा न्यायालयाने त्याच्या जामिनाची मुदत ४ डिसेंबरपर्यंत वाढवली होती. नऊ हजार कोटींच्या कर्जप्रकरणी निर्दोष असल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मल्ल्याने न्यायालयात केला होता.
 
२ मार्च २०१६ पासून फरार
मल्ल्या सध्या लंडनमध्ये अालिशान जीवन जगत आहे. २ मार्च २०१६ रोजी भारतातून पळालेल्या मल्ल्याच्या मागावर सध्या अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय असली तरी ताे ब्रिटनमध्ये असल्याने त्याला अटक करणे शक्य झालेले नाही. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात मुंबईतील विशेष न्यायालयाने मल्ल्यास फरार घोषित केलेले आहे. शिवाय त्याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे.

ब्रिटिश कोर्टात गुन्हा सिद्ध करावा लागणार
- ब्रिटिश कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीची ब्रिटनमध्ये मालमत्ता असेल तर तो विना पासपोर्ट तेथे राहू शकतो. त्यामुळे भारताला ब्रिटिश कोर्टात त्याच्यावर असलेले आरोप सिद्ध करावे लागतील.
- आरोप सिद्ध झाले तरच ब्रिटन सरकार प्रत्यार्पणाचा आदेश देऊ शकेल.
- तपास संस्था मल्ल्यावरील आरोप
सिद्ध करू शकली नाही तर तो भारताच्या ताब्यात मिळणे कठीणच.
- प्रत्यार्पणाबाबत सुनावणीनंतर अखेरचा निर्णय ब्रिटिश परराष्ट्र मंत्रालय घेते.
- मल्ल्यावर आरोप सिद्ध झाले तरी त्याला उच्च न्यायालयात अपिलाचा अधिकार आहे.
बातम्या आणखी आहेत...