आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Can Head The Panel For National Polls, But State Polls With Gadkari In Charge Advani

अडवानींची आता नवी खेळी : लोकसभा व विधानसभेसाठी वेगवेगळे प्रचारप्रमुख नेमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भाजपमध्ये अंतर्गत कलह थांबण्याचे नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला आहे. येत्या वर्षअखेरीस चार-पाच राज्यांच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी प्रचार समितीचे प्रमुखपदाची अडवानींनी दिलेली ऑफर माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी चाणाक्षपणे नाकारल्यानंतर अडवानींनी आता आणखी एक खेळी खेळली आहे.

याबाबत सांगितले जात आहे की, प्रचार समिती प्रमुखपदी मोदी यांची निवड पक्षाने आधीच जाहीर केल्यामुळे अडवानींची ऑफर स्वीकारण्यास व मोदींच्याविरोधात जाण्यास कोणताही नेता तयार नाही. अशा स्थितीत अडवानी यांनी एक पाऊल मागे घेतले असले तरी त्यासाठी त्यांनी एक अट टाकली आहे. लोकसभा निवडणुकाच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी जर मोदी यांचे नाव जाहीर झाले तरी विधानसभेसाठी प्रचार समिती स्वतंत्र असावी, असे अडवानी यांनी नव्याने म्हटले आहे. याबाबत अडवानी यांनी राजनाथ यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अडवानी यांनी राजनाथसिंगांना ठासून सांगितले की, येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी भलेही मोदी जबाबदारी पार पाडो पण विधानसभेसाठी स्वतंत्र समिती असावी.

यावरुन हे स्पष्ट होते की, अडवानी लोकसभा व विधानसभेसाठी दोन वेगवेगळ्या प्रचार समित्या स्थापन करण्याच्या मताचे आहेत. तसेच विधानसभा प्रचार समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे सोपवावी. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन गडकरी यांनी आपण कोणत्याही समितीचे प्रमुखपद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. आपण नागपूरमधून लोकसभा लढवणार आहे. त्यामुळे आपल्याला तयारी करायची आहे. तसेच आता आपण नव्याने कोणत्याही वादात अडकू इच्छित नाही.

याबाबत सांगितले जात आहे की, राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यासह इतर राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूका वर्षअखेर होत आहेत. राजस्थान वगळता इतर राज्ये भाजपकडे आहेत व तेथे पुन्हा सत्तेत येणयाची चिन्हे आहेत. तसेच राजस्थानमध्ये सुद्धा वसुंधरा राजे व कटारिया यांच्यातील वाद मिटवल्याने भाजपला सत्तेत येण्याचा विश्वास आहे. या सर्व घडामोडी पाहता नरेंद्र मोदींना प्रचार समितीचे प्रमुखपद दिल्यास मोदीसमर्थक गट त्यांचा देशभर गवगवा करतील व याचे सारे श्रेय मोदींना देतील, या भीतीनेच अडवानी-स्वराज गटाचा सतत नव-नव्या खेळी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मोदींच्या विरोधात पाऊल उचलण्यास इतर कोणताही तयार नाही, हेच दिसून येत आहे.