नवी दिल्ली - पतंप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नेपाळ दौर्यावर असताना पशुपतिनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी 2500 किलो चंदनाचे लाकूड आणि 2400 किलो शुद्ध तुप दान करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठीचा एकूण खर्च साधारण 4.10 कोटी रुपये असणार आहे. ही रक्कम सरकारी खात्यातून दिली जाणार की मोदींच्या अकाऊंटमधून हे अजून गुलदस्त्यात आहे. हे दान जर सरकरच्या खात्यातून दिले गेले तर त्यावरुन मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. जर मोदी स्वतः खर्चाचा भार उचलणार असतील तर, त्यांची एकूण संपती (स्थावर व जंगम) दोन कोटी रुपयांपेक्षाही कमी आहे.
मोदींच्या दानाची किंमत किती?
कर्नाटक सरकारच्या कावेरी हॅन्डीक्राफ्ट एम्पोरियमच्या वेबसाइटवर एक किलो चंदनच्या लाकडाची किंमत 16 हजार रुपये आहे. त्या हिशेबाने 2500 किलो चंदनाची किंमत चार कोटी रुपये होते. शुद्ध तुपाचा भाव 400 रुपये किलो आहे. मोदींनी 2400 किलो तुप दान देण्याचे वचन दिले आहे. त्याची किंमत साधारण 9.60 लाख रुपये होईल.
कोण देणार पैसे?
केंद्र सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोदींनी वचन दिलेल्या दानाची रक्कम कोण अदा करणार हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, रीडिफ डॉट कॉम या न्यूज वेबसाइटने एका वरिष्ठ अधिकार्याच्या हवाल्याने ही रक्कम सरकारी खजिन्यातून दिली जाईल असे म्हटले आहे. अधिकारी म्हणाले, भारताकडून भक्तीभावाने हे दान दिले जाईल असे सांगितले आहे. मात्र, वेबसाइटने एका ज्येष्ठ पत्रकाराच्या हवाल्याने लिहिले आहे, की पंतप्रधान तीन-चार वर्षांमध्ये स्वखर्चाने हे दान करणार आहेत.
मोदींची संपत्ती
लोकसभा निवडणुक लढवत असताना मोदींनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे 65,91,852 रुपये रोख होते. त्यापैकी 58,54,383 रुपये विविध बँकांमध्ये जमा आहेत. याशिवाय त्यांनी गांधीनगरमध्ये एक मालमत्ता असल्याचाही उल्लेख केला होता. ज्याची किंमत एक कोटी रुपये असल्याचे सांगितले होते.
पुढील स्लाइडमध्ये, नेपाळ दौर्यावरील मोदी