आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Going To Launch Start Up India Campaign Today

आजपासून ‘स्टार्टअप इंडिया’, पंतप्रधानांच्या हस्ते होणार सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी "स्टार्टअप इंडिया' अभियानाला सुरुवात करणार आहेत. त्याआधी स्टार्टअप कंपन्या आणि त्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी काही सूचना केल्या आहेत.

यात कंपनी सुरू झाल्यानंतर ती बंद करण्याचे नियम सुलभ बनवणे आणि गुंतवणुकीवर करात सूट मिळावी हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्टार्टअप इंडियाच्या या कार्यक्रमातच यासंबंधी काही घोषणा होण्याची अपेक्षाही या गुंतवणूकदारांनी व्यक्त केली आहे. स्टार्टअपसाठी पैसे जमा करण्याचे नियम सुलभ असायला हवेत, असे मत गुंतवणूकदारांची संघटना "टाई सिलिकॉन व्हॅली'चे अध्यक्ष व्यंकटेश शुक्ला यांनी व्यक्त केले. अनेक स्टार्टअप कंपन्या बंद होत असल्यामुळे त्यांच्यासाठी बंद करण्याचे नियम अधिक सोपे असायला हवेत, असेही त्यांनी सांगितले.

शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास करात सूट मिळत असली तरी स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केल्यास कर भरावा लागत असल्याचे मत इन्व्हेंट्स कॅपिटलचे एमडी कंवल रेखी यांनी व्यक्त केले. याचप्रमाणे मॉरिशसमधून होणाऱ्या गुंतवणुकीला करात सूट अाहे, तर अमेरिकेतून होणाऱ्या गुंतवणुकीला कर भरावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुगलने पाच सर्वात सृजनात्मक स्टार्टअपची निवड केली आहे. हे सर्व "स्टार्टअप इंडिया'च्या कार्यक्रमात भाग घेतील. यातील तीन स्टार्टअपसोबत "दिव्य मराठी'ने चर्चा केली आणि त्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा विचारल्या.
प्रमुख मागण्या

- स्टार्टअपसाठी पैसे जमा करण्याचे नियम सोपे करावे
- कंपनी सुरू करण्याचे आणि बंद करण्याचे नियम सोपे हवे
- मॉरिशसप्रमाणे अमेरिकेतील गुंतवणुकीवर कर नसावा
- स्वस्त कर्ज, तीन वर्षांपर्यंत करात सवलत, सरकारी योजनेत सहभागी करावे.

गुरुजी लर्निंग लॅब्ज
शिवानंद सलगामे, सहसंस्थापक

अाम्हाला सरकारकडून संधी हवी आहे. सरकार आपल्या निविदेत विचारते की, कंपनी किती जुनी आहे? तिचा किती टर्नओव्हर किती आहे? जसे की, शाळेत आयसीटी योजना आहेत, त्यात जुन्या कंपन्या आहेत. त्यांची पद्धतही जुनी आहे. लोकांना नव्या पद्धतीने कामाची संधी मिळायला हवी. आयसीटी योजनेत लुबाडणूक आहे. सरकारला अशा जुन्या नियमांना तोडावे लागणार आहे. सरकारी योजनांचा फायदा स्टार्टअपला झाल्यास चांगली सूचना प्रणाली स्थापित होईल.

कार्डिक डिझाइन लॅब्ज
आनंद मदनगोपाल, संस्थापक तथा सीईओ

सध्या हृदयाशी संबंधित तपासणीची मशिनरी फक्त मोठ्या शहरांत आणि दवाखान्यांतच आहे. आपली मशीन ३०-४० हजार रुपयांची असून आपण प्रति व्यक्ती पैसे आकारतो. यात ५० रुपयांत तपासणी शक्य आहे. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे जे स्टार्टअप चालवू शकतात त्यांना सरकारने पैसा उपलब्ध करून द्यावा. सरकारने १० हजार कोटी रुपयांचा संयुक्त निधी ठेवला असून त्याचा उपयोग लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी करावा.

स्लेमडंग
मधुवंती, संस्थापक,
सखी, सहसंस्थापक
आमची कंपनी क्रीडा क्षेत्राशी संबंधित क्षमतेच्या अंदाजासाठी स्मार्ट घड्याळ आणि इतर गॅजेट बनवते. सरकारच्या सर्व योजनांची सूचना एकाच ठिकाणी मिळायला हवी, असे आम्हाला वाटते. सर्व स्टार्टअपला एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळायला हवी. त्यांना निधी कुठे मिळेल हे माहिती असायला हवे. असे झाल्यानंतरच नव्या लोकांना संधी मिळेल. अमेरिकेत ७० टक्के नोकऱ्या छोट्या कंपन्या देतात, असे भारतातदेखील झाले पाहिजे.