आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाची अर्थव्यवस्था भक्कमच, जीडीपी पहिल्यांदा ५.७ टक्के झालाय का :नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत काँग्रेस आणि भाजप नेत्यांनी केलेल्या हल्ल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहीर उत्तर दिले. देशाच्या जीडीपीचा विकास दर ५.७ टक्क्यांवर आला असल्याबद्दल होत असलेल्या टीकेवर बोलताना मोदींनी भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असल्याचा दावा केला. जीडीपी काही पहिल्यांदा ५.७ टक्क्यांवर आलेला नाही. मागच्या सरकारच्या कार्यकाळात ६ वर्षांमध्ये ८ वेळा विकास दर ५.७ टक्क्यांहून खाली आला होता, असेही मोदी म्हणाले.

देशात सुरू असलेल्या योजना व विकासाबाबतची सविस्तर आकडेवारी मांडताना मोदींनी अर्थव्यवस्थेत अनेक सकारात्मक गोष्टी सुरू असल्याचा दावा करून गुंतवणूक वाढ व आर्थिक विकासाला गती देण्यासाठी यापुढेही पावले उचलत राहू, असा निश्चय त्यांनी बोलून दाखवला. कंपनी सचिवांच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात बोलताना पुढील तिमाहीत जीडीपीत ७.७% वृद्धी होईल, असे मोदी म्हणाले.
विरोधकांची टीका म्हणजे षडयंत्र असल्याचे सांगून आपली वाटचाल विरोधकांना सहन होत नसल्याची टीका मोदींनी केली. “वर्तमानाची चिंता करत देशाच्या भविष्याशी खेळता येणार नाही. मी रेवड्या उधळत नाही म्हणून माझ्यावर नेहमी टीका होते’, असे ते म्हणाले. नोटाबंदीबाबत टीकेला उत्तर देताना मोदी म्हणाले, ८ नोव्हेंबर हा दिवस इतिहासात भ्रष्टाचार मुक्तीच्या अभियानाचा प्रारंभ दिन म्हणून ओळखला जाईल. गरज पडल्यास जीएसटीमध्ये बदलाचे संकेत देत प्रामाणिकपणाला न्याय मिळेल, असे त्यांनी सांगितले.
 
 
 वर्तमानाची चिंता करत उपाययोजना करत असताना देशाच्या भविष्याशी आपल्याला खेळता येणार नाही. मी कधी रेवड्या उधळत नाही म्हणूनच माझ्यावर नेहमी टीका होते’
- नरेंद्र माेदी, पंतप्रधान
 
१. आरोप : नोटाबंदी आत्महत्या करण्यासारखेच... अर्थव्यवस्था ढासळलेली असताना नोटाबंदी लागू केल्याने आगीत तेल ओतल्यासारखे झाले.
मोदी : आर्थिक आघाडीवरील टीका आम्ही चुकीची मानत नाही. नोटाबंदीचा निर्णय ही आमची हिम्मत होती. मागच्या सरकारमध्ये ६ वर्षांत ८ वेळा विकास दर ५.७ टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक घसरला होता. विकास दर १.५% , ०.२% पर्यंत खाली आला होता. एका तिमाहीत विकास दर घसरला तर या नकारात्मक मानसिकतेच्या लोकांना स्वप्नपूर्तीचा आनंद होण्यासारखे आहे.
 
२. आरोप : जीएसटीने अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला. रोजगार कमी झाला. गुंतवणूकही कमी होत आहे.
मोदी : जूननंतर पॅसेंजर कारची विक्री १२%, व्यावसायिक वाहनांची २३%, ट्रॅक्टरची ३४% आणि दुचाकी वाहनांची विक्री १४% वाढली आहे. हवाई मार्गाने मालाची वाहतूक १६% आणि टेलिफाेन ग्राहक ४ टक्क्यांहून अधिक वाढले. गृह फायनान्स, नॉन बँकिंग फायनान्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्समध्ये गुंतवणूक वाढली आहे. कॅश टू जीडीपी प्रमाण १२% कमी होऊन ९%, महागाई १०% कमी होऊन सुमारे २.५% आणि चालू खाते तूट ४% कमी होऊन सरासरी १% आहे. विदेशी चलन ४० हजार कोटी डॉलरच्या वर आहे. दोन कोटी पीएफ खाती उघडली गेली. ही सर्व भक्कम अर्थव्यवस्थेची लक्षणे आहेत.
 
आरोप : नोटाबंदी आणि जीएसटीमुळे विकास वेडा झाला. मोदी सरकार चालवू शकत नसतील तर काँग्रेसला सत्ता सोपवावी.
मोदी : महाभारतात दुर्योधन म्हणाला होता, धर्म पाळणे माझी प्रवृत्ती होऊ शकली नाही आणि अधर्म मी सोडू शकलो नाही. मूठभर लोक कर्णाचा सारथी शल्यासारखे नकारत्मकता पसरवत आहेत. डोकलाम वादावरही हेच लोक आम्हाला घेरत होते. त्यातून मार्ग काढलाच ना. या लोकांसाठीच सरकार पहिल्या दिवसापासून स्वच्छता अभियान चालवत आहे.
 
आरोप : काळा पैसा पांढरा झाला? अतिरेकी आजही घुसखोरी करताहेत.
मोदी : पहिल्याच दिवशी काळा पैसा देशात यावा म्हणून एसआयटी स्थापन केली. इतर देशांशी करार केले. आज काळ्या पैशाचा व्यवहार करताना लोक आता पन्नास वेळा विचार करतात. आम्ही २.१० लाख बनावट कंपन्या बंद केल्या. २०२२ पर्यंत देशात एकही अशी कंपनी राहणार नाही.
 
आराेप : जीएसटीने देशाचे कंबरडे मोडले. व्यापार बसला.
मोदी : जीएसटीला तीन महिने होत आहेत. जीएसटी परिषदेने व्यापाऱ्यांची अडचण होत असल्याचे व त्याचा आढावा घ्यावा, असे सांगितले आहे. प्रत्येक बदलाला सामोरे जाण्याची सरकारची तयारी आहे. या व्यापाऱ्यांचे जुने व्यवहार पाहिले जाणार नाहीत.
 
टाळ्या का कमी झाल्या?
1 जुलैला मोदींनी चार्टर्ड अकाउंटंटचा आणि आता कंपनी सचिवांचा वर्ग घेतला. आता प्रत्येक कंपनी प्रामाणिकपणे कर भरणार का? ... या वाक्यावर टाळ्या अचानक कमी झाल्या. पंतप्रधान मोदी हसून म्हणाले, टाळ्या कमी का झाल्या?
बातम्या आणखी आहेत...