आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी सरकारचे बार फुसकेच नुसतीच 'हवाबाजी': सोनिया गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. मोदींना देशातील खरी परिस्थितीच माहीत नसल्याचे सांगून त्यांनी निवडणूक प्रचारात दिलेली आश्वासने केवळ "हवाबाजी' असल्याचे सेानिया म्हणाल्या.
वृत्तपत्रांत मोठ-मोठ्या बातम्या छापून येण्यापुरतीच ही आश्वासने होती. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सरकारवर आरोप करताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असल्याचे सांगितले. दरम्यान, या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी तूर्त सोनिया गांधी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. सोनियांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ या वर्षी डिसेंबपरपर्यंत संपत होता. मात्र, कार्यकारिणीने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. यामुळे राहुल काँग्रेस अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. सूत्रांनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अध्यक्ष बदलण्याची जोखीम घेणे टाळले. शिवाय राहुल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यासाठी आणखी काही दिवस त्यांना अनुभव यावा, हा पण कार्यकारिणीचा उद्देश आहे.
भूसंपादन आंदोलन, श्रेय राहुलचे
भूसंपादन विधेयकावर मोदी सरकारने ऐनवेळी भूमिका बदलली. यावरून असे दिसून येते की सरकारला वस्तुस्थिती माहीत नाही. राहुल यांनी या मुद्यावर गावोगाव जागृती केल्यामुळेच सरकारला माघार घ्यावी लागल्याचा दावा सोनिया यांनी केला. आरटीआय आणि मनरेगासारख्या मुद्यांवरही अशा आंदोलनाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.

इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न
आपली आश्वासने पूर्ण होऊ शकत नसल्याचे दिसू लागल्यानंतर सरकार आता माध्यमे, लेखक-साहित्यिकांसह सुधारणावादी विचारांना लक्ष्य करत असल्याची टीका सोनियांनी केली. आधुनिक भारताचे जनक पंडित जवाहरलाल नेहरू यांना लक्ष्य करून इतिहास दुसऱ्यांदा लिहिण्याचे प्रयत्न सरकार करत असल्याचेही त्या म्हणाल्या. मेक इन इंडिया ही नुसतीच घोषणा बनून राहिली. उलट रोजगाराच्या संधी कमी होत चालल्या असल्याचा दावाही सोनियांनी केला.

अपयश झाकण्यासाठी आरोप : स्मृती इराणी
आर्थिक अडचण असतानाही वन रँक, वन पेन्शनची घोषणा प्रत्यक्षात उतरवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाबाजीला प्रत्यक्ष साकारल्याचे केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी म्हटले आहे. सोनियांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना इराणी म्हणाल्या, आपल्या पक्षाचे व नेत्यांचे अपयश झाकण्यासाठी काँग्रेस नेते मोदी सरकारवर आरोप करत सुटले आहेत.

भूसंपादन विधेयकावर २० तारखेला सभा
भूसंपादन विधेयकातील दुरुस्त्यांवरून सरकारने घेतलेली माघार हे काँग्रेसचे मोठे यश असल्याचे सोनिया म्हणाल्या. या मुद्यावर आता २० सप्टेंबरला जाहीर सभा घेण्यात येईल. यादरम्यान राहुल गांधी १९ तारखेला बिहार व २१ तारखेला वृंदावनचा दौरा करणार आहेत. या बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीतील ५० टक्के पदे एससी, एसटी, ओबीसी महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकविषयक धोरणाबाबतही संभ्रम
पाकिस्तानबाबत एक सुसंगत धोरण आवश्यक असताना हे सरकार नेमके काय करावे यावर निर्णयच घेऊ शकत नसल्याचे सोनिया म्हणाल्या. निवडणूक प्रचारात डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांच्या धोरणांची जाहीर खिल्ली उडवणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा खरा चेहरा आता समोर आला आहे. त्यांचे नेमके धोरणच कुणाला कळेनासे झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

संघाकडे रिमोट
गेल्या आठवड्यात दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १५ सहसंस्थांची बैठक झाली. यात मंत्रिमंडळातील दिग्गज नेतेही हजर होते. ज्या पद्धतीने मोदी सरकार सरसंघचालकांसमाेर नतमस्तक झाले ते पाहता सरकारचे नियंत्रण अर्थात रिमोट संघाच्याच हाती असल्याचे
पुन्हा एकदा स्पष्ट झाले, असे सांगून सोनियांनी संघालाही लक्ष्य केले.