आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाच्या आरोग्यावर मोदींची छाप, योग दिनाचे ५० पेक्षा जास्त देशांकडून समर्थन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत केलेल्या भाषणावेळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची सूचना केली होती. मोदींच्या या कल्पनेला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ५० देशांनी पाठिंबा देत ही कल्पना उचलून धरली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर झाला तर जगाच्या आरोग्यावर मोदींची ठसा उमटल्याचे दिसणार आहे.

जगाचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी २१ जून हा दिवस संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना केली होती. त्यांच्या या कल्पनेला जगभरातून मिळणा-या प्रतिसादावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे संयुक्त राष्ट्रामध्ये भारतीय मिशनने या सूचनेचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. प्रस्ताव पुढे नेण्यासाठी भूतान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांसोबतच चीन, दक्षिण कोरिया, ब्राझील, अर्जेंटिना, नायजेरिया, इराण आदी देशांनी सहमती दर्शवली आहे. अमेरिका, कॅनडा या देशांनीही त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. युरोपीय संघाच्या (ईयू) देशांकडूनही त्याला पाठिंबा मिळेल, अशी भारताला आशा आहे

सूत्रांनी सांगितले, मोदींची अशी अपेक्षा आहे की जगाची प्रकृती बिघडवण्यास कारणीभूत ठरणा-या जीवनशैलीबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. त्याच्या प्रतिकूल परिणामांचा मुकाबला करण्यासाठी एकजूट होऊन जनजागृती केली गेली पाहिजे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून वर्षातील एक दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जावा. त्यासाठी संयुक्त राष्ट्राने पुढाकार घेण्याची गरज आहे.

बिघडत्या जीवनशैलीबाबत जनजागृतीचा प्रयत्न
एका अधिका-याने सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी नोव्हेंबरमध्ये जी -२० देशांच्या संमेलनासाठी तसेच पश्चिम आशिया परिषद तसेस सार्क संमेलनात सहभागी होणार आहेत. या िठकाणी पुन्हा एकदा योग दिनावर चर्चा होणे अपेक्षित आहे. या परिषदांमध्ये भारताकडून सर्व देशांसोबत या प्रस्तावाबाबत चर्चा केली जाईल. तसेच भारत यासंदर्भात संयुक्त राष्ट्राकडे औपचारिक प्रस्तावही सादर करणार आहे.’

बालदिनापासून 'बाल स्वच्छता मिशन'ची सुरुवात
एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार बालदिनाचे औचित्य साधून (१४ नोव्हेंबर) सरकार बाल स्वच्छता मिशनची सुरुवात करण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत देशातील मुलेदेखील पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी आरोग्य मिशनशी जोडली जावेत, असे सरकारला वाटते. गेल्या आठवड्यात खासदारांसोबत चर्चा करताना मोदींनी त्यांना मुलांमध्ये जाऊन त्यांना स्वच्छता मिशनचे महत्त्व समजून सांगण्याचे आवाहन केले होते.