आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींच्या \'शिव\' प्रेमामुळे भाजपात कलह; मोदीच सर्वात लोकप्रिय- राजनाथ सिंह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष अंतर्गत कुरबूरीनेच त्रस्त आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांची स्तुती केल्याने मोदी नाराज झाले आहेत, तर सर्वाधिक प्रसिद्ध कोण हा पक्षात वादच नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांना द्यावे लागले आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही अडवाणींच्या बोलण्याचा वेगळा अर्थ लावू नये असे आवाहन केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांची प्रशंसा केली होती. तसेच त्यांची तुलना ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी केल्याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी नाराज झाले आहेत. शिवराजसिंहांच्या गुणगौरवाने भाजप अंतर्गत वातावरण तापायला लागल्याने सोमवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी स्वतः या वादात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'अडवाणींच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.' तर, शिवराजसिंह चौहाण यांनी या वादावर पडदा टाकण्यासाठी, 'मी नम्रपणे सांगू इच्छितो की, अडवाणीजी आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या कामाची प्रशंसा केली. नरेंद्र मोदी आणि रमणसिंह माझे वरिष्ठ आहेत. आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही. हे दोघेही माझ्या पुढे असून मी क्रमांक तीनवर आहे,' असे ट्विट त्यांनी केले आहे.

भाजपचा कोणता मुख्यमंत्री सर्वाधिक कार्यक्षम आहे, हा वाद अडवाणींच्या मध्यप्रदेशातील एका कार्यक्रमातील वक्तव्याने सुरू झाला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची प्रशंसा करताना अडवाणी म्हणाले, त्यांची विनम्रता बघून मला अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण झाली.
अडवाणी म्हणाले होते की, शिवराजसिंहांच्या नेतृत्वातील सरकारने मध्यप्रदेशात विकासाचे नवे मार्ग खुले केले आहेत. शिवराजसिंह २००५ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा या राज्याची स्थिती अत्यंत वाईट होती. ती परिस्थिती आता बदलली आहे. गुजरातबाबत ते म्हणाले, गुजरात सुरुवातीपासूनच समृद्ध राज्य राहिले आहे. मोदींनी त्याला अधिक समृद्ध केले.
सुत्रांच्या माहितीनुसार, चौहाण यांची जाहीर प्रशंसा आणि गुजरातच्या विकासाला कमी लेखने मोदींना आवडलेले नाही. त्यासाठी त्यांनी राजनाथसिंह यांना फोन करून स्वतः राजनाथसिंह किंवा अडवाणींनी यावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यावर मोदींनी स्वतः अडवाणींशी बोलावे असे राजनाथसिंहानी सुचवल्याचे कळते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडवाणी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मध्यप्रदेशचे राजकारण त्यांनी जवळून पाहिले आहे. शिवराजसिंह हे त्यांना मुलासारखे आहेत. त्यामुळे त्यांनी केलेले वक्तव्य हे योग्यच आहे. शिवराजसिंह हे विनम्र नेते आहेत. मला वाटते अडवाणींच्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेण्यात आला आहे, तो तसा घेण्यात येऊ नये.

भाजपच्या अंतर्गत कलहामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावारण आहे. पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी यावर ट्विट केले की, भाजपमध्ये अडवाणी विरुद्ध मोदी विरुद्ध राजनाथ विरुद्ध सुषमा विरुद्ध अरुण जेटली असा खेळ सुरू आहे. तर, काँग्रेस नेते शकील अहमद यांनी भाजपला चिमटा काढत म्हटले, अडवाणींनी आता गुजरातमधून निवडणूक लढली तर त्यांचा पराभव पक्का आहे. त्यामुळेच ते सध्या उत्तरप्रदेशात सुरक्षीत मतदारसंघ शोधत आहेत. पण, माझ्या मते ते, बिहारमधून निवडणुक लढवतील.