आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Jock On Gujarati Poor, Congress Critse On Poverty Line

गुजराती गरिबांची मोदींकडून थट्टा, दारिद्र्यरेषेच्या निकषांवर काँग्रेसकडून टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गरिबीच्या मापदंडावरून सोमवारी गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. गुजरातमध्ये 10.80 रुपये उत्पन्नावरून गरिबांची ओळख पटवणे हा सरळ अवमान आहे. नरेंद्र मोदींनी त्यासाठी माफी मागितली पाहिजे. त्यावर केंद्र निकष ठरवते. राज्यांकडून केवळ त्याची अंमलबजावणी केली जाते, असा भाजपने पलटवार केला.
नियोजन आयोगाकडून काही आकड्यांचा तपशील जाहीर केला होता, तेव्हा मोदी आणि भाजपने त्याची टिंगल केली होती. 32 रुपये कमवणा-यांना गरीब न मानणे जर थट्टा असेल तर 10.80 रुपयांच्या निकषावर मोदी सरकारला नक्की काय म्हणायचे आहे? असा सवाल काँग्रेसच्या संवाद विभागाचे प्रमुख अजय माकन यांनी केला आहे. वास्तविक नियोजन आयोगाने काही दिवसांपूर्वी शहरांत 32, तर ग्रामीण भागात 26 रुपये एवढे तुटपुंजे उत्पन्न असलेल्या व्यक्तीला गरीब वर्गात समाविष्ट करता येणार नसल्याचे म्हटले होते. त्यावरून देशभरात वादाला तोंड फुटले होते.
त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारमण म्हणाल्या, काँग्रेसने होमवर्क करावा. बीपीएलचे निकष तयार करण्याचे काम हा केंद्र सरकारच्या विशेषाधिकाराचा भाग आहे. निकषांचे अवलोकन करावे, अशी मागणी करत गुजरातने अनेक वेळा केंद्राला स्मरणपत्रे पाठवली होती; परंतु केंद्राने मसुद्यामध्ये कसलीही सुधारणा केली नाही.
काय आहे प्रकरण ?
गुजरातच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने 16 डिसेंबर 2013 रोजी पाठवलेल्या एका पत्रावरून हा वाद सुरू झाला आहे. गावात महिन्याला 324 आणि शहरात 501 रुपयांची कमाई असणा-या लोकांनाच बीपीएलमध्ये समाविष्ट केले जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले होते. अर्थात गावात प्रति दिवशी 10.80 रुपये आणि शहरात 16.80 रुपये उत्पन्न असलेली व्यक्ती गरीब ठरते. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे.
राज्यांनी निर्णय घ्यावा
राज्यांना गरिबीचा निकष मान्य नसेल तर त्यांनी स्वत:चे निकष तयार करावेत. तशा कुटुंबाची आर्थिक, सामाजिक क्षमता लक्षात घेऊन त्यांचा समावेश बीपीएलमध्ये करावा, आमची हरकत नाही. राज्याला तसे करा येऊ शकते. खरा प्रश्न मात्र वेगळाच आहे.
- अजय माकन, काँग्रेस नेते
गुजरातचा मोठेपणा
गुजरातमध्ये 21 लाख नागरिक बीपीएल कुटुंबांमध्ये समाविष्ट होतात; परंतु राज्य सरकारने अतिरिक्त 11 लाख लोकांना आपल्या खर्चावर अनुदानावरील धान्य आणि इतर सुविधा पुरवल्या आहेत. खरे तर काँग्रेसने आपल्या धोरणाचा फेरविचार करायला हवा. - निर्मला सीतारमण, भाजप प्रवक्त्या
भाजपकडून दिशाभूल
भाजपने अगोदर काही प्रश्नांची उत्तरे द्यावीत. पक्षाचे सर्व प्रवक्ते नेमक्या याच वेळी गुजरात सरकारच्या नागरी पुरवठा विभागावर चर्चा का करत आहेत? यातून भाजपची मंडळी लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केल्याचा आरोपही माकन यांनी केला.