आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Not Become Prime Minister, He Only Sell Tea Manishankar Ayyar

मोदी कधीही पंतप्रधान बनू शकणार, त्यांनी आता चहाच विकावा - मणिशंकर अय्यर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बेताल बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले आहे. 21 व्या शतकात मोदी कधीही पंतप्रधान बनू शकणार नाही. त्यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत चहा विकावा, असे वक्तव्य अय्यर यांनी केले आहे. अय्यर यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजपच नव्हे, तर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही टीकेची झोड उठवली आहे.
तालकटोरा स्टेडियमवर सुरू असलेल्या काँग्रेस अधिवेशनाप्रसंगी शुक्रवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अय्यर यांचा तोल सुटला. 21 व्या शतकात मोदी पंतप्रधान बनू शकत नाही. कधीच नाही. हा माझा शब्द आहे. तुम्ही लिहून ठेवा. पण त्यांना इथे चहा विकायचा असेल तर आम्ही त्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ, असे अय्यर म्हणाले. नेहरू-गांधींच्या घराणेशाहीवर टीका करताना मोदी नेहमीच आपल्या हलाखीच्या परिस्थितीचा उल्लेख करतात. एकेकाळी आपण चहा विकत होतो, असे ते सांगत असतात. त्या संदर्भात अय्यर यांनी हे अवमानकारक वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे मोदींच्या गरिबीची खिल्ली उडवल्याबद्दल माफी मागणार का, असे विचारल्यानंतर माफी कशाची मागायची, असा उलट सवाल करून माफी मागण्यासही त्यांनी नकार दिला.
उमर अब्दुल्लाही भडकले
अय्यर यांच्या वक्तव्याने जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लाही भडकले. मोदींच्या अनेक गोष्टी चुकीच्या असतील; परंतु गरिबीची खिल्ली उडवण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे ट्विट उमर यांनी केले आहे.
माफी कशाची ? तेच सांगतात
माफी कशाची मागायची. मोदीच जाहीर सभांमधून आपली कहाणी सांगतात. म्हणून मी म्हणालो की ते कधीही पंतप्रधान बनू शकणार नाही, त्यांनी तालकटोरा स्टेडियमवर चहाचा स्टॉल लावावा अशा शब्दांत अय्यर यांनी माफी मागण्यास नकार दिला.
अय्यरचे मत कोण मागतोय, जनतेची इच्छा आहे - र्पीकर
अय्यर पंतप्रधान बनवणार नाहीत. मोदींसाठी त्यांचे मतही मागितले नाही. मोदी पंतप्रधान बनावे ही देशातील जनतेची इच्छा आहे. मोदींना देशभरात पाठिंबा मिळतोय हे त्याचेच प्रतीक आहे अशा शब्दांत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी अय्यर यांची खिल्ली उडवली.
धावत्या रेल्वेत चहा विकला : मोदी
माझा जन्म गरीब घरात झाला आहे. द्रारिद्रय़ काय आहे ते मी पाहिले आहे. मी रेल्वे स्थानकावरच नव्हे धावत्या रेल्वेतही चहा विकलेला आहे. रेल्वेमंत्र्यांपेक्षा रेल्वेत चहा विकणार्‍याला रेल्वेचा कारभार अधिक माहिती असतो असे पाटणा येथील जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले होते.
सपा नेत्याचेही वादग्रस्त विधान
सपा नेते नरेश अग्रवाल यांनीही उत्तर प्रदेशातील एका सभेत मोदींच्या गरिबीची खिल्ली उडवली होती. चहावाल्यास राष्ट्रीय प्रश्नांचा आवाका नसतो. हवालदाराकडे कधीही पोलिस उपअधीक्षकाची क्षमता नसते तसेच हे आहे, असे अग्रवाल म्हणाले होते.
चहावाला राजघराण्याचा पराभव करेल : भाजप
सन 2014 चे हे युद्ध होऊनच जाऊ द्या. एकेकाळी चहा विकणाराच राजघराण्यातील प्रतिनिधीचा पराभव करेल त्या वेळी ही भारतीय लोकशाही किती मजबूत आहे हे दिसून येईल, अशा शब्दांत भाजप नेते अरुण जेटली यांनी अय्यर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.