आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सबसिडीच्या पैशाने खेडी होतील चूलविरहित, सरकार गरिबांसाठीच : मोदींचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या आवाहनानुसार देशातील सुमारे ४ लाख लोकांनी गॅस सबसिडी नाकारली आहे. यातून होणा-या बचतीमधून सरकारी तिजोरीत २०० कोटी रुपयांची भर पडेल. मात्र, ही रक्कम सरकार अवास्तव खर्च करणार नाही. यातून गरिबांनाच गॅस सिलिंडर पुरवले जातील, यातून चूलविरहित खेडी तयार होतील व पर्यावरणाचे रक्षणही होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांसमोर ते बोलत होते. खासदारांनी जनहितार्थ चालवलेली कामे कशा प्रकारची असावीत, याचे मार्गदर्शन मोदींनी केले. हे सरकार आणि धोरणे केवळ गरिबांसाठीच समर्पित आहेत, हे कामांतून दिसले पाहिजे, असे ते म्हणाले. आज ग्रामीण भागांत चुलींचा प्रचंड प्रमाणात वापर होतो. यातून निघणा-या धुरामुळे या लोकांच्या आरोग्यालाही धोका असतो. शिवाय, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. या गरिबांना अशा दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी गॅस सबसिडी नाकारणा-यांमुळे तिजोरीत जमा झालेला पैसा वापरला जाईल, अशी हमी त्यांनी दिली.

मोदींनी या वेळी केंद्र सरकारच्या वतीने चालवल्या जाणा-या विविध योजनांचेही दाखले दिले. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, भूसंपादन अशा विविध याेजना व धोरणांवर मोदींनी भाष्य केले. आपण जे कार्य करतो, जे निर्णय घेतो ते राजकारणाच्या तराजूत नव्हेे, राष्ट्रहितार्थ आखलेल्या धोरणांच्या तराजूत मोजले गेले पाहिजेत. म्हणूनच जन-धनसारखी योजना महत्त्वाची आहे. यातून गरिबांनाच लाभ होणार आहे, असे मोदी म्हणाले.

येमेनमध्ये सुरू असलेल्या यादवीत अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी चालवलेल्या मोहिमेचेही त्यांनी कौतुक केले. २४ तास बॉम्बवर्षाव सुरू असताना चालवण्यात आलेली ही बचाव मोहीम जगासाठी आदर्श ठरल्याचेही ते म्हणाले.

अामदार, खासदारांनी सबसिडी नाकारली
पंतप्रधानांच्या अावाहनाला प्रतिसाद देत जळगावचे आमदार सुरेश भोळे व खासदार ए.टी.पाटील यांनी गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारले. दोघांच्या वतीने आमदार भोळे यांनी एलपीजी वितरक संघटनेचे अध्यक्ष व रेखा गॅस एजन्सीचे संचालक दिलीप चौबे यांना पत्र लिहिले आहे.