आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींविरुद्ध प्रियंका!, कॉंग्रेसच्या गोटात खळबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना तोडीस तोड म्हणून काँग्रेस प्रियंका गांधी-वढेरा यांना प्रचाराच्या मैदानात उतरवणार असल्याच्या बातमीने सोमवारी दिवसभर राजकीय गोटात खळबळ होती. सकाळीच काही वाहिन्यांनी ही बातमी चालवली. मोदी जेथे जातील तेथे प्रियंका सभा घेणार असल्याचे बातम्यांत म्हटले होते. वाहिन्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा हवाला दिला, मात्र कुणाचेही नाव घेतले नव्हते.

ही बातमी झळकताच भाजपचे अनेक नेते सक्रिय झाले. मोदींच्या नेतृत्वासमोर राहुल गांधी यांची छबी प्रभावहीन ठरल्याने प्रियंका यांना मैदानात उतरवले जात असल्याचे हे नेते सांगत सुटले. यामुळे काँग्रेस गोटातही अस्वस्थता पसरली. अध्र्या तासांतच काँग्रेस प्रवक्ते अजय माकन स्पष्टीकरण देण्यासाठी मैदानात उतरले. भाजपचा हा डाव असल्याचे सांगत त्यांनी याचे खापर मीडियावर फोडले. ते म्हणाले, ‘भाजपचा हा डाव आहे. यात काही वाहिन्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.’ मध्य प्रदेशात रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीच्या भयंकर घटनेवरून लेाकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हा डाव असल्याचे ते म्हणाले. गेल्या निवडणुकीप्रमाणे फक्त रायबरेली (सोनिया गांधी) आणि अमेठी (राहुल गांधी) या दोनच मतदारसंघांत प्रियंका प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

यानंतरही मुद्दा थंडावला नाही. भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पुन्हा राहुल गांधींच्या अपयशाचा पाढा वाचून हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगितले. या बातमीचा स्रोत भाजप मुख्यालय नवहे, काँग्रेस मुख्यालय असल्याचेही ते म्हणाले.


अगोदर बातमी आली.. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा हवाला देऊन वृत्तवाहिन्यांनी दावा केला की आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मोदींविरुद्ध प्रियंका गांधी यांना प्रचारात उतरवणार आहे. देशभर त्या प्रचार करतील.

भाजपने मुद्दा उचलला : बातमी येताच भाजप प्रवक्ते सक्रिय झाले. राहुल गांधी सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत असल्याने आता प्रियंका यांना पुढे केले जात असल्याचे सांगत मोदींची काँग्रेसला धास्ती वाटत असल्याचे हे प्रवक्ते सांगत सुटले.

काँग्रेस म्हणाली, ‘सब झूठ’! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रियंका यांची प्रचारकार्यातील दावेदारी योग्य असल्याचे वाहिन्यांना सांगितले असले तरी प्रवक्ते अजय माकन यांनी हा दावा चुकीचा ठरवला. भाजपनेच ही बातमी पेरल्याचा आरोप त्यांनी केला.


राष्ट्रवादीचा फॉर्म्युला अमान्यच
आघाडीच्या जागावाटपात यंदाही 26 : 22 चा फॉर्म्युला असेल, हा राष्ट्रवादीचा दावा कॉँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारीही खोडून काढला. याबाबत अंतिम निर्णय दिल्लीतच होईल, असे पक्षाच्या संसदीय बोर्डाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत ठरले. तसेच खासदारांच्या कामगिरीचा आढावाही घेण्यात आला.