आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Wants Parliamentary Board\'s Stamp On His Plan

अन्न सुरक्षा विधेयकाला भाजप करणार विरोध; मोदी घेणार राष्ट्रपती मुखर्जींची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवडणूक प्रचार समितीची पहिली बैठक आज (गुरुवार) झाली. उत्तराखंडमधील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पक्षातर्फे 16 जुलैला संपूर्ण देशात प्रार्थना सभेचे आयोजन केले जाणार आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या अन्न सुरक्षा अध्यादेशाला विरोध करणार असल्याचेही बैठकीत ठरले आहे.

या बैठकीसाठी गुरुवारी सकाळी मोदी दिल्लीत दाखल झाले तेव्हा सर्वप्रथम भाजप महासचिव वरुण गांधी आणि जनता पक्षाचे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचा तपशील मात्र कळू शकलेला नाही. मोदी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतींबरोबर काही महत्त्वाच्या मुद्यांवर ते चर्चा करणार आहेत. या भेटी दरम्यान ते राष्ट्रपतींना गुजरात भेटीचे निमंत्रण देण्याचीही शक्यता आहे.

भाजपमध्ये ही पहिली वेळ आहे की, निर्णयप्रक्रीये शिवाय इतर मुद्यावर पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक आयोजित केली गेली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते विजय सोनकर शास्त्री यांनी देखील संसदीय मंडळाच्या बैठकीला दुजोरा दिला आहे मात्र, बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार, याचा खुलासा केलेला नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये प्रचारमोहीम, रणनीतीबद्दल विचारविनिमय केला जाणार आहे. बैठकीत प्रचार समिती, निवडणूक जाहीरनामा, निवडणूक व्यवस्थापन समित्यांची स्थापना केली जाऊ शकते. त्याचे नेतृत्व अडवाणी गटाकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे.

भाजपमधील महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी संसदीय मंडळ महत्त्वाचे मानले जाते. यात ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजनाथ सिहं यांच्या शिवाय नरेंद्र मोदी आणि सर्व माजी अध्यक्षांचा समावेश आहे. संसदीय मंडळाची बैठक पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविणे, पक्षात कोणाला प्रवेश द्यावयाचा असल्यास किंवा एखाद्याला पक्षातून काढून टाकायचे असेल, अशा महत्त्वाच्या निर्णयांसाठी संसदीय मंडळाची बैठक आयोजित केली जाते. यात पक्षाची आगामी रणनीती ठरविणे किंवा रणनीती काय असेल यावर चर्चा होत नाही. मात्र, भाजपने मोदींच्या ब्ल्यू प्रिंटला हिरवा कंदील दाखविण्यासाठी संसदीय मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले आहे.