नवी दिल्ली- स्वयंपाकाच्या गॅसवरील अनुदान (एलपीजी सबसिडी) ग्राहकाच्या थेट बँक खात्यात वळते करण्याची योजना (मॉडिफाइड डायरेक्ट कॅश सबसिडी ट्रान्सफर स्कीम) येत्या एक जानेवारी 2015 पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी गॅसवरील अनुदानाचे पैसे रोख स्वरूपात लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट जमा करण्याची अभिनव योजना देशात पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. देशातील 54 जिल्ह्यात ही योजना 15 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याचेही प्रधान यांनी माहिती दिली.
येत्या एक जानेवारीपासून स्वयंपाकाच्या गॅसवर मिळणारे सरकारी अनुदान ग्राहकांच्या थेट बॅंक खात्यावर वळते केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तयारी सुरु केली आहे. धमेंद्र प्रधान व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून देशातील जिल्ह्याधिकारी तसेच पेट्रोलियम कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या बॅंकांच्या अधिकार्याशी संवाद साधला.
योजना सुरु करण्यापूर्वी पेट्रोलियम कंपन्या तसेच बॅंकांनी योग्य समन्वय राखावा. तसेच ग्राहकांच्या थेट बॅंक खात्यावर अनुदान वेळेत पोहोचेल, असे नियोजन करण्याच्या प्रधान यांनी संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.