नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी
नरेंद्र मोदी सरकारवर सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या आश्वासनांचीही आठवण करून दिली. त्याचबरोबर
आपला मतदारसंघ अमेठीमधील प्रस्तावित फूड पार्क रद्द करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. त्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी वैयक्तिक लक्ष घालेन, असे आश्वासन दिले.
लोकसभेत शून्यप्रहरी राहुल यांनी हा मुद्दा मांडला. राजकीय पुढा-यांकडे केवळ आश्वासने असतात. सर्वात मोठे आश्वासन पंतप्रधानांचे असते. गेल्या वर्षी अमेठीत पंतप्रधानांनी भाषण केले होते. एक गोष्ट मला आवडली होती. पंतप्रधानांनी अमेठीत शेतकरी, मजुरांना परिवर्तनाचे राजकारण करत असल्याचे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात वेगळेच घडत आहे. अमेठीतील प्रस्तावित फूड पार्क रद्द करू नका. उत्तरात राजनाथ म्हणाले, फूड पार्कला २०१० मध्ये तत्त्वत: मंजुरी मिळाली होती. गेल्या ३-४ वर्षांत काय घडले? या गोष्टीत मला जायचे नाही. परंतु अमेठीतील प्रकल्पात काय घडत आहे, हे जरूर पाहिले पाहिजे. वैयक्तिक पातळीवर मी या प्रकरणात लक्ष घालीन. दरम्यान, सुटीवरून आल्यानंतर राहुल यांचा संसदेत नवा अवतार पाहण्यास मिळू लागला आहे.
गुन्हेगारी मानहानीप्रकरणी राहुल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा : गुन्हेगारी मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांच्याविरोधातील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिली. राहुल यांनी गेल्या वर्षी ठाण्याच्या भिवंडीमध्ये आयोजित निवडणूक सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप केला होता. त्यावर संघाच्या कार्यकर्त्याने खटला दाखल केला होता. न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रफुल्लचंद पंत यांच्या पीठाने सांगितले, ८ जुलैपर्यंत कनिष्ठ कोर्टात त्यावरील सुनावणीला स्थगिती असेल. कोर्टाने याचिकाकर्ता आणि केंद्राकडून चार आठवड्यांत जबाब मागवला आहे. त्याशिवाय न्यायपीठाने याचिकेला भाजपचे सुब्रह्मण्यम स्वामी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्या याचिकांशी जोडले आहे.
ही काय जादू
राहुल यांनी सभागृहात प्रत्यक्ष शेतावरील अनुभव सांगितला. काही दिवसांपूर्वी मी शेताच्या बांधावर एका शेतक-याला भेटलो. तेथे शेतक-याने बटाटे दोन रुपये किलो विकतो, असे सांगितले. परंतु त्यांची मुले जे चिप्स खातात, त्याची पाकिटे दहा रुपयांना मिळतात. त्यात केवळ एका बटाट्याचे चिप्स असतात. ही काय जादू आहे, शेतक-याकडून दोन रु. किलो दराने खरेदी केल्या जाणा-या बटाट्याचे चिप्स दहा रुपयांत कसे विकले जातात? त्यावर राजनाथ म्हणाले, ही जादू आमच्या नव्हे, तर मागील सरकारने केली आहे. सुडाचा प्रश्नच नाही. आम्हाला देशाचा विकास करायचा आहे. एकटा सत्ताधारी पक्ष ते करू शकत नाही. त्यासाठी सत्ताधारी पक्षासह विरोधी आणि सर्वच पक्षांची गरज असते.
राहुल यांना पहिल्याच दिवशी
ट्विटरवर १ हजार फॉलोअर
राहुल गांधी आता ट्विटरशी जोडले गेले आहेत. टि्वटरचे हे त्यांचे वैयक्तिक नव्हे, तर कार्यालयाशी संबंधित ट्विटर हँडल अाहे. पहिल्याच दिवशी त्यांना फॉलो करणा-यांची संख्या हजारावर पोहोचली. पहिल्या दिवशीच्या ट्विटमध्ये त्यांच्या औपचारिक कार्यक्रमांची सूचना दिली जाईल. १२ मेपासून तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातून १५ किमी यात्रेस सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.