आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Money Finance For Terrorist News In Divya Marathi

349 खात्यांतून दहशतवाद्यांना मिळते आर्थिक पाठबळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ‘रॉ’ (रिसर्च अँड अँनालिसिस विंग) या भारतीय गुप्तचर संघटनेने दहशतवादी कारवायांसाठी उपयोगात येत असलेल्या 349 बचत खात्यांची ओळख पटवली आहे. यापैकी सर्वाधिक 133 खाती स्टेट बँक ऑफ इंडियाची असून आयसीआयसीआयच्या 33 तर पंजाब नॅशनल बँकेतील 18 खात्यांचा समावेश आहे. यापैकी सुमारे 26 खाती बँक ऑफ बडोदा, ओरिएंटल बँक ऑफ कॉर्मस, युनियन बँक ऑफ इंडिया, युनायटेड कर्मशियल बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील आहेत. तर 131 खात्यांची अद्याप बँकवार माहिती उपलब्ध झाली नाही.

‘रॉ’चा यासंबंधीचा अहवाल गुप्तचर विभागाने (आयबी) मागच्या महिन्याच्या 21 तारखेला गृहमंत्रालयाकडे सुपूर्द केला. दहशतवादी संघटनेला मिळणारी आर्थिक मदत, त्याचे स्रोत आणि पद्धतीविषयीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी गट भारतातील बँकिंग क्षेत्रावर नजर ठेवून असून बनावट लॉटरी रॅकेट चालवण्याच्या बहाण्याने या 349 बँक खात्यांतून ते भारतात रक्कम पाठवत आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बँक लूट आणि खंडणीच्या माध्यमातून पैसे जमवत आहेत. अतिरेकी गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार, बँक लूट आणि खंडणीच्या माध्यमातून दहशतवादी पैशाची जुळवाजुळव करत आहेत. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य मिर्झा शादाब बेग याने दुबईत ‘माल-ए-गनिमत’ (युद्धाचे बक्षीस) या नावाने संस्था उघडली आहे. लोकांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे हे या संस्थेचे काम आहे. बेगच्या साथीदारांनी यासाठी दुबईमधून अनेक सिम कार्डची खरेदी केली आहे. याबाबत इंडियन मुजाहिदीनचा दहशतवादी अब्दुला अख्तर याने राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासादरम्यान माहिती दिली आहे. भारतात खंडणीची रक्कम पाठवण्यासाठी शादाबने आपल्याला आखाती देशांतील व्यापार्‍यांशी बोलण्यास सांगितले होते, असे अख्तरने तपासात उघड केले आहे. बेग हा पुणे आणि कोलकात्यात अपहरणकांड घडवण्याच्या तयारीत असल्याचे त्याने सांगितले आहे.

दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन हादेखील घातपाती कारवायांना पैसा उपलब्ध करुन देण्यासाठी सक्रीय झाल्याचे वृत्त आहे. त्यासाठी तो अमली पदार्थांच्या तस्करीत उतरला आहे. दाऊदने नायजेरियातील संघटना ‘बोको हरम’शी संधान बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत, गुप्तचर विभागाचा अहवाल आहे. दाऊदने त्याचा भाऊ अनीसला यासाठी नुकतेच लाओसला पाठवले होते. त्याने तिथे बोको हरमचा म्होरक्या अबू बकर शेकाऊ आणि अल कायदाच्या कमांडरची भेट घेतल्याचे सांगितले जाते.

एनजीओंवर पाळत
या गुप्त अहवालात आर्थिक गुप्तचर विभागाचे संचालक एन.एन. पांडे यांच्या मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातील अहवालाचाही समावेश आहे. दहशतवाद्यांना मिळत असलेल्या आर्थिक मदतीत एनजीओंची भूमिका असल्याचे पांडे यांच्या अहवालात सांगितले आहे. गृहमंत्रालयानेसुद्धा अनेक एनजीओंचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे म्हटले होते. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशातून निधी मिळत असलेल्या 42 हजार एनजीओंपैकी फक्त 60 टक्के संस्थाच सरकारला संपूर्ण तपशील देत आहेत.