Home »National »Delhi» Money Laundering Case Of Himachal Pradesh Cm Virbhadrasingh Rawat

‘सरफरोशी की तमन्ना...’ गुणगुणत वीरभद्रसिंह ‘ईडी’च्या कार्यालयात, मनी लाँडरिंग प्रकरण

वृत्तसंस्था | Apr 21, 2017, 04:20 AM IST

  • ‘सरफरोशी की तमन्ना...’ गुणगुणत वीरभद्रसिंह ‘ईडी’च्या कार्यालयात, मनी लाँडरिंग प्रकरण
नवी दिल्ली - मनी लाँडरिंग प्रकरणात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे अखेर गुरुवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. या प्रकरणी वीरभद्रसिंह आणि इतरांवर आरोप आहेत. सिंह हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास अधिकृत वाहनाने ‘ईडी’च्या कार्यालयात आले. कारवरील लाल दिवा झाकलेला होता. वीरभद्रसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला नाही. ते हवेत मूठ आवळून ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में हैं, देखना है जोर कितना बाजू ए कातिल में है,’ या देशभक्तिपर गीताच्या ओळी गुणगुणताना दिसले.

या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी तसेच या बेहिशेही संपत्ती प्रकरणात जप्त केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ‘ईडी’ने सिंह यांना समन्स काढले होते. आपण उपस्थित राहू शकत नसल्याची कारणे देणारे निवेदन सिंह यांनी गेल्या आठवड्यात ‘ईडी’ला पाठवले होते. त्यानंतर गुरुवारी हजर राहण्यासाठी नवीन समन्स काढण्यात आले.

अटक न करण्याची हमी देण्यास ‘ईडी’ने दिला होता नकार : वीरभद्र सिंह हजर होतील तेव्हा त्यांना अटक करण्यात येणार नाही, अशी कुठलीही हमी देण्यास ‘ईडी’ने दिल्ली उच्च न्यायालयात नकार दिला होता. आपल्याविरोधातील मनी लाँडरिंगची कारवाई रद्द करावी, अशी विनंती सिंह यांनी न्यायालयाकडे केली होती. त्या वेळी न्यायमूर्ती गौबा यांनी हे स्पष्ट केले होते.
असे आहे प्रकरण
उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा १० कोटी रुपयांची जास्त संपत्ती जमा केल्याच्या कथित आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वीरभद्रसिंह, त्यांची पत्नी प्रतिभा आणि इतरांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ‘ईडी’ने सिंह यांना समन्स काढले होते. तत्पूर्वीही, ‘ईडी’ने सिंह यांना समन्स काढले होते, पण काही शासकीय कामे असल्याचे सांगत ते हजर राहिले नाहीत. सीबीआयने यासंदर्भात सप्टेंबर २०१५ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ‘ईडी’ने वीरभद्रसिंह, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांच्या विरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.

व्होरा, हुड्डांची ‘ईडी’द्वारे चौकशी
नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे प्रकाशक असलेल्या असोसिएटेड जर्नल लिमिटेडला (एजेएल) २००५ मध्ये पंचकुला येथील प्लाॅट दिल्याच्या प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारातील मनी लाँडरिंगप्रकरणी ‘ईडी’ने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांची चौकशी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस असलेल्या व्होरा (८८) यांची दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. त्याच काळात हुड्डा यांचीही चंदिगडमध्ये चौकशी झाली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) या दोघांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. या प्रकरणात जप्त केलेल्या आणि आढळलेली कागदपत्रेही त्यांना दाखवण्यात आली होती. व्होरा हे एजेएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. व्होरा यांचे वय लक्षात घेऊन तसेच आपल्या घरीच चौकशी करावी, अशी त्यांनी केलेली मागणी लक्षात घेऊन ‘ईडी’ने त्यांना विशेष सवलत देत त्यांची घरीच चौकशी केली.
असे आहे प्रकरण :चंदिगडमधील हा प्लॉट एजेएलला १९८२ मध्ये देण्यात आला होता. भाडेपट्ट्याचा कालावधी १९९६ मध्ये संपल्यानंतर बन्सीलाल सरकारने या प्लॉटचा पुन्हा ताबा घेतला होता. २००५ मध्ये काँग्रेस सरकारने हा प्लॉट पुन्हा एजेएलला दिला. एजेएलला पुन्हा देण्याऐवजी तो खुल्या लिलावाद्वारे विकायला हवा होता, तसे न केल्याने हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाच्या (हुडा) तत्कालीन अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांनी सरकारी तिजोरीचे नुकसान केले, असा आरोप दक्षता आयोगाने केला होता. त्यानंतर ‘ईडी’ने फौजदारी तक्रार दाखल केली होती. मनी लाँडरिंगप्रकरणी हुडा, एजेएलचे चार अधिकारी आणि इतरांवर गुन्हा दाखल झाला होता.

Next Article

Recommended