आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभसंकेत: निकोबार बेटांवर सुरु झाला पावसाळा, आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1 जून पर्यंत मान्सून केरळात पोहचण्याचा अंदाज... (फाईल) - Divya Marathi
1 जून पर्यंत मान्सून केरळात पोहचण्याचा अंदाज... (फाईल)
 पुणे- नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रासह  निकोबार बेटांवर दाखल झाल्याचे भारतीय हवामान खात्याने रविवारी जाहीर केले. मान्सूनची आगेकूच होण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण असून तीन दिवसांत तो संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे व बंगालच्या उपसागरात मुसंडी मारेल. अंदमान-निकोबार बेटांवरील मान्सूनच्या आगमनाची सरासरी तारीख २० मे आहे. मात्र यंदा आठवडाभर आधीच मान्सून निकोबार बेटांवर पोचला. दरम्यान, महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सून दाखल होऊ शकतो.
 
केरळमध्ये प्रतीक्षा : संपूर्ण अंदमान-निकोबार व्यापल्यानंतर १ जूनच्या सुमारास मान्सून केरळात अपेक्षित असतो. यंदा इतक्यात अंदाज मांडता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.
 
हवामान खात्याचा दुसरा अंदाज महिनाअखेरीस
यंदा देशात सरासरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. यंदाच्या पावसाळ्याबद्दलचा दुसरा अंदाज महिनाअखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे. देशात वर्षभर पडणाऱ्या पावसापैकी तब्बल ७५ टक्के पाऊस फक्त जून ते ऑक्टोबर या चार महिन्यांत मान्सूनचा असतो. सन २०१६ मधील पावसाळा १८ मे रोजी मोसमी वारे अंदमान-निकोबार बेटांवर दाखल झाल्यानंतर सुरू झाला होता.
 
मान्सूनचे सरासरी आगमन
अंदमान-निकोबार     २० मे
केरळ किनारपट्टी     १  जून
कर्नाटक-तामिळनाडू     ५ जून
तळकोकण                ७ जून
मुंबई-खान्देश-मराठवाडा १० जून

राज्यात २४ तासांत पूर्वमोसमी पाऊस
गेल्या चोवीस तासांत आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मध्य महाराष्ट्र तसेच केरळ, तामिळनाडूत तुरळक ठिकाणी वादळी पाऊस झाला. मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्याने चोवीस तासांत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
बातम्या आणखी आहेत...