आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monsoon Coulld Be Below Average, Indian Meteorological Department

मान्सूनच्या जुगाराचे फासे यंदाही दुष्काळाकडेच, \'आयएमडी\'ला चाहूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/ नवी दिल्ली - भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या नैऋत्य मोसमी वा-यांसोबत (मान्सून) येणा-या पावसाचे पहिले भाकीत बुधवारी जाहीर केले. यंदा देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस पडेल, असे "आयएमडी'ने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

या अंदाजाची टक्केवारी पाच टक्क्यांनी कमी किंवा जास्त होण्याची शक्यता गृहीत धरली जाते. हवामान खात्याचा मागील चार वर्षांचा अंदाज आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस याच्या आकडेवारीनुसार यंदा पाऊस सरासरी गाठण्याची शक्यता आहे. या आकडेवारीनुसार देशात यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव झाल्यास ग्रामीण अर्थचक्र मंद होऊन महागाई अाणखी भडकण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून अपेक्षित असणारी व्याजदर कपात लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांत मध्य पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान मान्सूनसाठी अनुकूल होते. मात्र, पूर्व पॅसिफिक महासागरातील पृष्ठभागाचे तापमान वाढले. डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ कालावधीत या प्रवाहांचे तापमान सरासरीपेक्षा वाढले. अल-निनोचे अस्तित्व दाखवणारी ही निरीक्षणे असल्याचे ‘आयएमडी'ने म्हटले आहे.

अवकाळीतच रुजली सुमार मान्सूनची बीजे : - जानेवारी ते मार्च काळात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीत सुमार मान्सूनची बीजे रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते फेब्रुवारीत अवकाळी पाऊस दरवर्षी होतो. मात्र, यंदा त्याचा मुक्काम मार्चपर्यंत वाढला. अवकाळी पाऊस साधारणपणे अर्धा तास त्या परिसराला झोडपतो असा आजवरच्या परंपरेला यंदा छेद गेला. दीर्घकालीन अवकाळीबाबत फारसे संशोधन भारतात झालेले नाही. मात्र, यंदाच्या अवकाळीसाठी बंगालच्या उपसागरावरून येणारे पूर्व वारे, प्रशांत महासागरातील दशकभरातील वारे, जेट प्रवाह, तिबेटच्या पठाराचे व अर्क्टिकचे वाढते तापमान आणि पश्चिमेकडील वा-यांचा परिणाम आदी कारणे कारणीभूत आहेत. यामुळेच ऐन उन्हाळ्यात कधी पारा चाळिशीत, तर कधी हुडहुडी असा अनुभव देशभरात येत आहे. यामुळे मान्सूनच्या वा-यांवर मोठा परिणाम होणार असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

काळजीचे कारण
देशपातळीवर ९३% पावसाचा अंदाज देणा-या 'आयएमडी'ने नोंदवलेली पुढील निरीक्षणे काळजी वाढवणारी आहेत.
28% शक्यता यंदा सरासरीइतका पाऊस पडण्याची
68% शक्यता यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची
01% सरासरी ओलांडण्याची चिन्हे फक्त

परिणाम : महागाई वाढणार ?
खरीप पिके जसे तांदूळ, ऊस, सोयाबीन आणि कापूस यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या घटू शकते.
यामुळे महागाईत आणखी वाढ होण्याची शक्यता
आरबीआयकडून व्याजदरात कपातीची शक्यता धूसर
उत्पादन कमी झाल्याने शेतक-यांचे उत्पन्न घटणार

दुसरा अंदाज जूनमध्ये
मान्सूनच्या केरळमधील आगमनाबद्दलचा अंदाज १५ मेच्या सुमारास दिला जाणार आहे. देशातील प्रदेशनिहाय पावसाचा दुसरा अंदाज जून महिन्यात प्रसिद्ध होईल. हिंदी महासागर किंवा अंदमानच्या समुद्रात एेनवेळी होणारा कोणताही हवामान बदल मान्सूनच्या प्रवासावर परिणाम करू शकतो. त्यामुळे आताच त्याबद्दल बोलणे योग्य होणार नाही, असे ‘आयएमडी'च्या सूत्रांनी सांगितले.

ग्रामीण अर्थचक्र मंदावणार
हवामान खात्याने आपल्या पहिल्या मान्सूनपूर्व अंदाजात सरासरीपेक्षा कमी पावसाचे भाकीत केले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाची धग सोसणा-या गावगाड्याला यंदाही दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यास खरीप पिकांचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हाती येणारी रोकड आवक कमी होणार असून ग्रामीण अर्थचक्र मंदावणार आहे.

भारतावरील परिणाम
१९८२ : अल निनोमुळे प्रशांत आणि हिंदी महासागरातील सर्व वातावरण बिघडले. जगातील अनेक देशांत दुष्काळ
१९८७ : २० व्या शतकातील सर्वात भयानक दुष्काळ. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशासह देशातील ब-याच राज्यांना फटका.
१९९७-९८ : सर्वात कार्यक्षम अल निनो, मात्र पावसावर फारसा परिणाम नाही. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस.
२००२ : देशातील सर्वात कमी कालावधीचा पावसाळा होता. अल निनोचा प्रभाव मध्यम होता. पावसात १५ टक्के घट, खरिपाचे उत्पादन घटले.
२००४ : जुलै, सप्टेंबरमध्ये पावसाचा दगा. मागील २० वर्षांतील भयावह दुष्काळ. देशाचा ६८ टक्के भागाला दुष्काळाची झळ.
२००९ : अल निनोच्या प्रभाव तीव्र. देशातील ६०४ पैकी ३१५ जिल्हे सरकारकडून दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर. साखरेच्या किमतींचा ३० वर्षांच्या उच्चांक.
२०१२ : अल निनोच्या प्रभावामुळे देशात चार वर्षांतील दुसरा दुष्काळ. देशातील अन्नधान्याचे कोठार असलेल्या पंजाबमध्ये सरासरीपेक्षा
७० टक्के पाऊस कमी.

कमी पावसामुळे महागाई वाढू शकते, परंतु आताच घाबरण्याची गरज नाही. मान्सूनच्या आगमनासाठी आणखी दोन महिने आहेत. प्रतीक्षा करावी लागणार.
-मदन सबनवीस, मुख्य अर्थतज्ज्ञ, केअर रेटिंग्ज

शेतीवर परिणाम होऊन
ग्रामीण भागात मागणी घटणार. महागाईची शक्यता. सरकारने परिस्थिती नियंत्रणासाठी आतापासूनच तयारी करावी. - एस.के. सिन्हा, संचालक, इंडिया रेटिंग्ज