आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Monsoon Reach In Keral, Within 48 Hours Lower Kokan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळमध्ये मान्सून बरसला, ४८ तासांत तळकोकणात! हलक्या पावसाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ पुणे - उकाड्याने हैराण झालेल्या देशवासीयांसाठी केरळमधून खुशखबर आहे. नैऋत्य मोसमी पाऊस शुक्रवारी केरळ किनारपट्टीवर धडकला. त्याला आगेकूच होण्यासाठी पोषक वातावरण आहे. पहिल्याच टप्प्यात संपूर्ण केरळ व्यापून तो दक्षिण कर्नाटकातील मंगळुरूपर्यंत पोहोचला. मंगळुरू ते तळकोकणातील सावंतवाडी हे गाडीवाटेचे अंतर पाहता मान्सून महाराष्ट्रापासून २७० मैलांवर आहे. येत्या ४८ तासांत तळकोकण व तामिळनाडू-आंध्र प्रदेशचा संपूर्ण भाग मान्सूनच्या धारांनी चिंब होण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याने सांगितले.

शनिवारी अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस होऊ शकतो. मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनासाठी अनुकूल हवामानबदल झालेले नाहीत. त्यामुळे राज्यातील आगमनाचा अंदाज सांगता येणार नाही, असे पुणे वेधशाळेच्या सूत्रांनी सांगितले.

सह्याद्री डोंगररांगा व कोकणात काळ्या ढगांच्या छायेमुळे सूर्य दिसला नाही. तर पश्चिम व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात हलक्या सरी पडल्या. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने राज्यात तापमान घटले. शनिवारी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

‘पाऊस होणार १०२ टक्केच’
स्कायमेटने देशात १०२ टक्के पावसाची शक्यता वर्तवली. अल-निनोचा प्रभाव असेल मात्र त्याच्यावर इंडियन ओशन डायपोल (आयओडी) घटनेचा प्रभाव पडेल. १९६७, १९७७, १९९७ आणि २००६ मध्ये अल-निनो असूनही आयओडीमुळे पुरेसा पाऊस पडला, असा दावा केला.

राज्यातील पाऊस
*रत्नागिरी-४४
*कोल्हापूर-३४
*महाबळेश्वर-१९
* पुणे-११
*सांगली-४७
*सातारा-१७
*सोलापूर-५
*नगर-६
*नांदेड-१
*परभणी-१२ (मिलिमीटरमध्ये)

डिझेल, बियाणे, विजेवर सबसिडी
अपु-या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सक्रिय झाले असून कमी पावसाचा धान्य उत्पादनावर परिणाम झाला तर शेतक-यांना डिझेल, बियाणे व विजेवर सबसिडी दिली जाईल, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले. डिझेलवर १० रुपये प्रतिलिटर आणि बियाण्यांवर ५० टक्के सबसिडी दिली जाऊ शकते.