नवी दिल्ली - संसदेत 'ललितगेट'वरुन पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही गोंधळ सुरु आहे. काँग्रेस सदस्यांनी गुरुवारी देखील दोन्ही सभागृहांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्यावरुन गदारोळ केला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी गंभीर आरोप केला आहे. विरोधकांचा विरोध कॅमेरात दाखवला जात नाही, असे त्या म्हणाल्या. लोकसभेतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण लोकसभा टीव्ही करते.
लोकसभेची कार्यवाही सुरु होताच, काँग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरु केला. काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक सदस्य दुसऱ्या दिवशीही काळी फित लावून सभागृहात आले. त्यानंतर दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. त्याआधी काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी स्थगन प्रस्ताव दिला होता. राज्यसभेच्या कामकाजालाही गोंधळात सुरुवात झाली.
सोनिया - राहुल यांचा सरकारवर हल्लाबोल
लोकसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित झाल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
सोनिया गांधी म्हणाल्या, लोकसभा टीव्हीचे कॅमेरे विरोधीपक्षांचा विरोध दाखवत नाहीत. विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचू दिला जात नाही. त्यानंतर राहुल गांधी म्हणाले, ही मोदींची विरोधकांचा आवाज दाबण्याची पद्धत आहे. हीच मोदींची काम करण्याची स्टाइल आहे.
पंतप्रधानांच्या बोलण्यात वजन नाही - राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडण्याची मागणी केली. ते म्हणाले, पंतप्रधान मध्यप्रदेशातील व्यापमं घोटाळा, आणि ललित मोदी प्रकरणावर अजूनही चूप आहेत. त्यांनी मौन सोडले पाहिजे. त्यांच्या मौनामुळे सरकारवरुन जनतेचा विश्वास उडत चालला आहे. त्यांनी जनतेला भ्रष्टाचार मुक्त भारताचे आश्वासन दिले होते. त्यांच्या बोलण्यात वजन नसते. ते हवेत बोलतात, असा आरोप राहुल यांनी केला.
भाजपने केली होती तयारी
गुरुवारी राज्यसभेचे कामकाज गोंधळातच सुरु झाले. त्यानंतर दुपारी 12 पर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. मात्र, भाजपने आज आरोपांना प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली होती. सूत्रांच्या माहितीनूसार, सरकार ललितगेट वरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर देऊ शकते. भाजपने तशी तयारी केली आहे. त्याशिवाय काँग्रेसवर पलटवार करण्यासाठी भाजप खासदार दोन्ही सभागृहांमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता होती. रावत यांच्यावर बुधवारी भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यासाठी कथित स्टिंगचा पुरावा म्हणून वापर केला जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, काय झाले संसदेत