नवी दिल्ली - खरिपाच्या पेरणीच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी मृग, आद्र्रा ही नक्षत्रे यंदा कोरडी गेली. मागील पाच वर्षांतील सर्वात कोरडा जून सरला, तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या पाच राज्यांत दुष्काळाची 60 टक्के शक्यता स्कायमेट संस्थेने व्यक्त केली आहे. एप्रिलमध्ये याच संस्थेच्या अंदाजानुसार ही शक्यता 25 टक्के होती.
पुनर्वसू नक्षत्र लागले तरी पेरणी सुरू नाही. पावसाअभावी खरिपातील कापूस, मूग, उडीद, सोयाबीन, धान व ऊस या पिकांचा पेरा घटला आहे. कापसाची खाण मानल्या जाणार्या मराठवाडा, विदर्भ, गुजरातेत मान्सूनने दडी मारल्याने कपाशीची लागवड धोक्यात आहे.
दुष्काळ उंबरठय़ावर : स्कायमेटचे मुख्य कार्यकारी जतिन सिंह यांनी सांगितले, मागील 41 वर्षांत देशात सरासरी 89 सेंटिमीटर पाऊस झाला. यंदा 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. यापूर्वी 2009 मध्ये दुष्काळ पडला होता, तेव्हा 78 टक्के पाऊस झाला होता. 2009 नंतर यंदाच्या जूनमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार 1951 ते 2000 पर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये देशभरात 57 टक्केच पाऊस झाला आहे.
पावसासाठी अजून दोन दिवस प्रतीक्षा
नैर्ऋत्य मोसमी पावसाने शनिवारी फारशी प्रगती केली नाही. कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता पुरेशी नसल्याने पाऊस पडत नसल्याचे वेधशाळेतील सूत्रांनी स्पष्ट केले. दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. केरळ व गोव्यालगत सर्व राज्यांत 6 व 7 जुलैला जोरदार पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा : समुद्रसपाटीवर उ. महाराष्ट्र ते कर्नाटक किनार्यालगत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता द. महाराष्ट्र ते उत्तर केरळच्या किनार्यालगत आहे. पण अपेक्षित तीव्रता नसल्याने पाऊस पडत नाही. येत्या 48 तासांत तीव्रता वाढल्यास पावसाची शक्यता आहे.
पाणी नाही, बांधकामे बंद करा : कलेक्टर
पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता पाहून जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी शनिवारी वैजापूर पालिका हद्दीतील बांधकामे बंद करण्याचे आदेश दिले. यामुळे 600 बांधकामे बंद होणार असून, 3 हजार मजुरांना फटका बसेल. जलसाठा काटकसरीने वापरण्याची सूचना त्यांनी केली.
पेरा घटला
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून कोरडा गेल्याने खरिपातील पेरा मोठय़ा प्रमाणात घटला आहे. देशात 27 जूनअखेर केवळ 131 लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पेरा 35 टक्क्यांनी घटला आहे.
जून-जुलैचे महत्त्व
मराठवाडा व विदर्भात खरीप पेरणीसाठी 15 जुलैपर्यंतचे हवामान उपयुक्त ठरते. 20 जुलैनंतर पाऊस झाल्यास फारसा फायदा होत नाही. कारण कमी कालावधीची कडधान्ये, तृणधान्यांना काढणीच्या वेळी पावसाचा तडाखा बसू शकतो.
गेल्या 24 तासांत : मान्सून काही प्रमाणात गोवा व कोकणात सक्रिय होता. त्यामुळे देवगड, महाड, र्शीवर्धन, पोलादपूर, अलिबाग, रोहा, मालवण आदी भागात सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)