आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More People Killed In Road Accidents In India Than World Over

भारतात रस्ते अपघातांत होतात सर्वाधिक मृत्यू - नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगाच्या तुलनेत रस्ते अपघातांमध्ये भारतात सर्वाधिक मृत्यू होतात. दरवर्षी होणाऱ्या पाच लाख अपघातांमध्ये १ लाख ३० हजार नागरिकांचा मृत्यू होत असल्याची माहिती भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
अपघाताला जबाबदार रस्ता बांधकामाशी संबंधित सर्वांवर गुन्हेगारी खटले दाखल करण्यात आले आहेत. अपघाताला चालक, वाईट रस्ते, वाहनाची अवस्था, पादचारी आणि खराब वातावरण कारणीभूत ठरते. याशिवाय रस्ता बांधणीतील दोष, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना निर्माण होणारी असुविधा तसेच महत्त्वाच्या भागातील भुयारी मार्गातील त्रुटी यामुळेही अपघात होतात, असे गडकरी म्हणाले. महामार्गावर प्रत्येक १०० किमी अंतरावर ट्रामा सेंटर्स स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी यासंदर्भात अंतिम निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले.

२०१४ मध्ये तामिळनाडूमध्ये ६७,२५० रस्ते अपघात झाले. त्यानंतर महाराष्ट्रात ६१,६२७ आणि मध्य प्रदेशात ५३,४७२ अपघात झाले. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना पोलिसांकडून त्रास दिला जाऊ नये, असे निर्देश राज्यांना देण्यात आले आहेत. अण्णाद्रमुकचे खासदार एम. थंबी दुराई म्हणाले, गाडी चालवताना मोबाइल फोनवर बोलणे, भुयारी रस्ते व पुलाचा अभाव ही अपघात होण्यामागची कारणे आहेत. ट्रकचालकांचा ताण कमी करण्यासाठी त्यांची केबिन वातानुकूलित करणे बंधनकारक केले पाहिजे. दरम्यान, गडकरी यांनी मंत्रालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने जलमार्ग वाढवण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार नवीन बंदरांचा विकास केला जाणार आहे. त्याचबरोबर जल वाहतुकीला प्रोत्साहन दिले जाईल.