आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother On Supreme, Why Should Not Entry In Temple Supreme Court

माता सर्वोच्च, घरातही पहिला मान, मग मंदिर प्रवेश का नाही.. SC चा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रात शनिशिंगणापुरात महिलांना मंदिर प्रवेशाचा हक्क मिळाल्यानंतर आता केरळमध्ये सबरीमालातील अय्यप्पा मंदिरात महिलांना असलेल्या प्रवेशबंदीचा मुद्दा गाजतो आहे. सोमवारी या प्रवेशबंदीबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले.

न्यायमूर्तींनी विचारले, ‘अध्यात्म काय फक्त पुरुषांसाठी आहे? महिला सहभागी होऊ शकत नाहीत का?’ वेद किंवा उपनिषदे स्त्री-पुरुष भेद करत नाहीत, असेही त्यांनी बजावले. या मंदिरात १० ते ५० वर्षांपर्यंतच्या महिलांना प्रवेशबंदी आहे. याविरुद्ध यंग लॉयर्स असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली असून सुनावणीदरम्यान मंदिर ट्रस्टचे वकील के. के. वेणुगोपाल यांनी युक्तिवाद केला तेव्हा न्यायालयाने कडक शब्दांत सुनावले. न्यायमूर्ती म्हणाले, ‘आपल्या देशात माता सर्वोच्च आहे. घरातही तिचा खूप सन्मान होतो. मग तिला मंदिरात प्रवेशबंदी कशी करता येऊ शकते?’ यावर वेणुगोपाल यांनी परंपरेबद्दल सांगितले. दीड हजार वर्षांपासून सबरीमालातील डोंगरांवरही महिलांना प्रवेशबंदी आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. यावर न्यायमूर्ती म्हणाले, मग महिलांना एव्हरेस्टवरही बंदी घालणार? ही प्रथा घटनात्मक समानाधिकार आणि धार्मिक स्वातंत्र्य या आधारेच तोलली जाईल. न्या. दीपक मिश्रा यांच्या न्यायपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. ते म्हणाले, देव-देवतांची पूजा कोणीही करू शकतो. आपण मूर्तिपूजा मानतो. मग कुणी महिला आहे म्हणून त्यांना येथे येऊ नका, असे सांगणार? या प्रकारांतून देशातील लैंगिक न्यायालाच धोका आहे.
यंग लॉयर्सने युक्तिवाद केला की, सती व हुंडा प्रथा पण या देशात हिंदू परंपरा मानली गेली होती. लोकांनी विरोध केला तेव्हा आज हे प्रकार गुन्हा ठरतात. यावर न्यायालयाने स्पष्ट केले की, घटनात्मक तरतुदींनुसारच यावर चर्चा व निकाल दिला जाईल. या प्रकरणी मंदिर ट्रस्टला सहा आठवड्यांत म्हणणे मांडावयाचे आहे.
पुढे वाचा.. शिंगणापुरात महिला प्रवेशामुळे अत्याचार वाढतील : शंकराचार्य