आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंतास जाणणाऱ्या रामानुजनवर पहिला चित्रपट, ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कुणी त्यांना अनंताला जाणणारे समजायचे तर कुणी जीनियस. मात्र, ते कसे होते? याचा बहुतेक कुणालाच अंदाज नसेल. कारण, १९२० मध्ये ते वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कालवश झाले. आता लवकरच या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. महान
गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्यावर हॉलीवूड चित्रपटाची निर्मिती झाली आहे. ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ हा चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होत आहे.

रामानुजन, ज्यांना फक्त गणितच यायचे, दुसऱ्या विषयांत काडीचाही रस नव्हता, ते ११ वीत गणित सोडून सर्व विषयांत नापास झाले. पुढील वर्षी बाहेरून परीक्षा देऊनही बारावी पास होऊ शकले नाहीत. यामुळे शिक्षण थांबले; पण गणित काही केल्या सुटले नाही. चरितार्थ चालवण्यासाठी ते मद्रास पोर्ट कोर्टमध्ये क्लार्क म्हणून काम करू लागले. वर्षभराच्या नोकरीत त्यांनी शेकडो फॉर्म्युले एका रजिस्टरमध्ये लिहून टाकले. दरम्यान, १६ व्या वर्षीच आपल्यापेक्षा वयाने मोठ्या जानकी अम्माल यांच्याशी त्यांचे लग्न झाले. गणितावरचे प्रेम काही कमी झाले नाही. त्यांनी एकदा पत्राद्वारे काही फॉर्म्युले केंब्रिज विद्यापीठाचे गणितज्ञ जी.एच. हार्डी यांना पाठवले. त्यातून हार्डींना त्यांच्या असामान्यत्वाची प्रचिती आली. त्यांनी त्वरित रामानुजन यांना लंडनला बोलावून घेतले. पण ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या रामानुजन यांना लंडनची हवा, खाणेपिणे मानवले नाही. भारतात परतताच त्यांना टीबीने ग्रासले. वर्षभराच्या आजारपणानंतर निधन झाले. भारतीय वंशाचे अमेरिकी गणितज्ञ मंजुल भार्गव हे चित्रपटाचे सहनिर्माते आणि सल्लागार आहेत. त्यांनीच ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला चित्रपटाबद्दल माहिती दिली.

कॅनिगल यांच्या पुस्तकावर आधारित
हा चित्रपट रॉबर्ट कॅनिगल यांच्या ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी : अ लाइफ ऑफ जीनियस रामानुजन’ पुस्तकावर आधारित आहे. रामानुजन यांची भूमिका ‘स्लमडॉग मिलेनियर’फेम देव पटेल साकारत आहे. (फोटोत उजवीकडे) जेरोमी इरॉन्स यांनी त्यांचे मेंटॉर गॉडफ्रे हार्डींची भूमिका केली आहे. दिग्दर्शक मॅट ब्राऊन व निर्माते एड प्रेसमॅन आहेत.