आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंबाखूबंदी करून चार कोटी लोकांना काम द्या - खासदार गांधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तंबाखूमुळेच कर्करोग होतो असे नाही तर या रोगासाठी कोणतेही कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे सांगत नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी देशातील तंबाखू आणि तंबाखूजन्य प्रत्येक पदार्थावर बंदी आणावी मात्र, हा निर्णय घेताना यावर अवलंबून असलेल्या चार कोटी लोकांच्या रोजगाराचे पुनर्वसन करावे यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खासदार गांधी यांचा ‘जावई शोध’ म्हणत त्यांना मोठा पुरस्कार मिळावा अशी टीका केली होती. त्यावर गांधी यांनी अण्णा हे नोबेल पुरस्कारास पात्र आहे. आम्ही त्यांची शिफारस करू असे प्रत्युत्तर दिले आहे.
तंबाखू व सिगारेटमुळे कर्करोग होत नसल्याचा निष्कर्ष दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या संसदीय समितीने काढला. मात्र, आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, तंबाखू आणि सिगारेटमुळेच कर्करोग होतो असे नाही तर तो इतर कारणांमुळेही होतो. अनेक व्यक्तींमध्ये कर्करोग कशाने झाला ते कळतही नाही. ज्यांनी आयुष्यात तंबाखूव तंबाखूजन्य पदार्थांचे कधीही सेवन केले नाही त्यांनाही कर्करोग होतो. तर अगदी बालपणापासून तंबाखू चघळणाऱ्या व्यक्ती ८०-९० वर्षे जगत असल्याचे उदाहरण समाजात पहायला मिळते.
याचा अर्थ असा नाही की मी तंबाखू सेवनाचे समर्थन करतो. २०११ मध्ये संपुआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनाच मी तंबाखूमुळे कर्करोग होतो का? त्याचे निकष काय आहेत? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी यासंदर्भात कोणतेही संशोधन उपलब्ध नसल्याची माहिती संसदेत दिली होती. तंबाखूवर बंदी आणणार का? या प्रश्नालाही त्या सरकारने बगल दिली होती. मात्र आता माझ्या विधानाचे उलटसुलट अर्थ मांडून त्याचे राजकारण केले जात आहे. पण हा मुद्दा राजकारण न करता सोडवला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अण्णांना ‘नोबेल’ पुरस्कार मिळावा

दिलीप गांधींनी फार मोठा शोध लावला आहे. त्यामुळे त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करायला हवा अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. यावर खासदार गांधी म्हणाले, अण्णा थोर समाजसेवक आहेत. एखाद्या विषयात नेमका काय संवाद झाला त्याची त्यांनी तपासणी करावी व नंतरच प्रतिक्रिया द्यावी. समाज त्यांच्या प्रत्येक वक्तव्यास गांभीर्याने घेतो त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढते. अण्णांचे कार्य इतके महान आहे की ते ‘नोबेल’ पुरस्कारास पात्र आहेत .
अन्य तंबाखूजन्य पदार्थांनीही होतो कॅन्सर

बंदीच आणायची असेल तर केवळ तंबाखू आणि सिगारेटवर नाही तर सरसकट तंबाखुजन्य पदार्थांवर आणावी असे मत संसदीय समितीमध्ये मी मांडले होते. तंबाखूमळे कर्करोग होत असेल तर तंबाखूजन्य अन्य पदार्थानेही होतो या मताचा मी आहे. परंतु हे करीत असताना देशात चार कोटी लोकांचा रोजगार यावर आहे त्याचे पुनर्वसन कसे करता येईल याचा प्रयत्न सरकारने करावा. बंदीसाठी घाईगर्दीत कायदा केल्याने लोकांच्या रोजगाराचे काय? हा प्रश्न उपस्थित होणार आहे. मी माझ्या समिती मार्फत सरकारला तसा प्रस्ताव देणार असल्याचेही खा. गांधी यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.