आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा तापले, भर लोकसभेतच खासदारांची एकमेकांना शिवीगाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तेलंगणाच्या मुद्दय़ावर सोमवारी संसदेमध्ये पुन्हा गोंधळ उडाला. आक्रमक खासदार माघार घेण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे लोकसभेत नऊ सदस्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. खासदारांनी एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप आहे. यामध्ये काँग्रेसच्या पाच तर तेलगू देसम पार्टीच्या चार खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेतही तेदपाच्या दोन खासदारांना निलंबित करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच आंध्र प्रदेशातील तेदपा व काँग्रेसच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सभापती मीरा कुमार यांनी त्यांना जागेवर बसण्यास सांगितले. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या वेळी मीरा कुमार यांनी काँग्रेसच्या पाच व तेदेपाच्या चार खासदारांच्या नावाचा उल्लेख नियम 374 (अ)नुसार केला. सभापतींच्या या घोषणेमुळे प्रस्तुत सदस्य पाच दिवसांसाठी किंवा अधिवेशन संपेपर्यंत निलंबित झाल्याचे मानले जाते. निलंबनासोबत सभापतींनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2.00 वाजेपर्यंत तहकूब केले.

दुपारी कामकाज सुरू झाल्यानंतर तेदेपाचे तीन खासदार सभागृहात अडून बसले. त्यांनी बाहेर जाण्यास नकार दिला. यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे भाग पडले. राज्यसभेमध्ये तेदेपाच्या दोन खासदारांनी तेलंगणाच्या मुद्दय़ावर वेलमध्ये जागेत बॅनर फडकवले. या वेळी उपाध्यक्ष पी.जे. कुरियन यांनी दोघांना निलंबित केले. नियम 255 नुसार त्यांना दिवसभरासाठी सभागृहाबाहेर काढण्यात आले.
तेलंगणावर 20 दिवसांत मंत्रिमंडळात प्रस्ताव : शिंदे
तेलंगणा राज्य निर्मितीबाबत 20 दिवसांच्या आत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, यासंदर्भात टिपण तयार केल्यानंतर प्रस्ताव विधी मंत्रालयाकडे पाठवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्यातील बारकावे तपासण्यासाठी प्रस्ताव मंत्रिगटाकडे सोपवला जाऊ शकतो.

कॉँग्रेस-तेदेपामध्ये शिवीगाळ केल्याचा आरोप
साधारण सव्वाअकरा वाजता निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. त्याच वेळी कॉँग्रेस व तेदेपाच्या खासदारांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे खासदार संदीप दीक्षित आणि मधू याक्षी गौड यांची तेदेपाचे के. कृष्णाप्पा, वेणुगोपाल रेड्डी, के.एन. राव आणि शिवप्रसाद यांच्याशी चकमक उडाली. दोन्ही पक्षांनी परस्परांना अपशब्द वापरून शिवीगाळ केल्याचा आरोप केला. भाजपचे खासदार शाहनवाज हुसेन यांनी खूप घाणेरड्या शिव्यांचा वापर केल्याचे संसदेबाहेर सांगितले.

एका अधिवेशनात दोनदा निलंबन
लोकसभेतील नऊ सदस्य एकाच अधिवेशनामध्ये दोन वेळा निलंबित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेलंगणाच्या मुद्दय़ावर 23 ऑगस्ट रोजी त्यांना निलंबित केले होते. सध्याच्या लोकसभेमध्ये खासदारांना निलंबित करण्याची ही तिसरी वेळ आहे. जवळपास वर्षभरापूर्वी तेलंगणा सर्मथक कॉँग्रेसच्या आठ खासदारांना घोषणाबाजी, गोंधळामुळे निलंबित करण्यात आले होते.

निलंबित सदस्य
लोकसभा : ए.साई प्रताप, अनंत वेंकटामी रेड्डी, एन. राजगोपाल, एम श्रीनिवासुलु रेड्डी, के. बापी राजू (सर्व काँग्रेस), कृष्णाप्पा, वेणुगोपाल रेड्डी, के.एन. राव, शिवप्रसाद (सर्व तेदपा)
राज्यसभा : सी.एम. रमेश आणि वाय.आर. चौधरी (दोघे तेदेपा)