आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam, Azmi Invite National Outrage With Remarks On Rape News In Divya Marathi

मुलायमसिंह यांच्या वक्तव्यावर संताप;संतप्त प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘लडके, लडके हैं, गलती हो जाती है,’या समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यांच्या वादग्रस्त विधानावर दुसर्‍याच दिवशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काँग्रेस, भाजपसह विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांच्या वक्तव्याचा संतप्त शब्दांत समाचार घेतला आहे. मुलायम यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. त्यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे, अशी प्रतिक्रिया राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी दिली आहे.

एकीकडे आक्षेपार्ह विधानांनी लोकसभा निवडणूक गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुलायमसिंह यादव यांनी गुरुवारी हे वादग्रस्त वक्तव्य करून त्यात भर घातली. मुलायमसिंह यांनी शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची गरज नाही, असे म्हणत त्यांची पाठराखण करणारे वक्तव्य केले होते. गेल्या आठवड्यात शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची गरज नव्हती. मुलांकडून चुका होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.

आझमींवर सुनेकडून टीका
अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांची सून व अभिनेत्री आयेशा टाकियाने ट्विटरवरून टीका केली आहे. आझमींनी केलेल्या वक्तव्याबाबतची माहिती मिळाली. मात्र मी व फरहान आम्ही दोघेही या विचाराच्या विरुद्ध आहोत, असे आयेशाने म्हटले आहे. एखादी महिला परपुरुषाबरोबर सहमतीने शारीरिक संबंध ठेवत असेल तर तीसुद्धा फाशीच्या शिक्षेसाठी पात्र असली पाहिजे, असे आझमी म्हणाले.

आक्षेपार्ह आणि लाजिरवाणे
बड्या नेत्यांनी असे वक्तव्य करणे हे केवळ आक्षेपार्हच नसून अत्यंत लाजिरवाणे आहे. आपण महिलांना किती सन्मान देतो हेच त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते मीम अफझल यांनी दिली आहे.

धक्कादायक व चुकीचा संदेश देणारे
मुलायमसिंह यांच्यासारख्या नेत्यांकडून आलेल्या वक्तव्याने आम्हाला धक्काच बसला. त्यातून अत्यंत चुकीचा संदेश गेला आहे. महिलांबाबत मुलायम यांच्या विचारांचा भाजप धिक्कार करते. देशातील जनतेने या वक्तव्याबद्दल मुलायम यांच्या विरोधात एकजुटीने उभे राहिले पाहिजे, असे भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीताराम यांनी म्हटले आहे.

महिला संघटना भडकल्या
मुलायमसिंह यांचे वक्तव्य धक्कादायक आणि अत्यंत निराशाजनक आहे. राज्यातील सरकारचे नेतृत्व करणार्‍या पक्षाच्या प्रमुखाने हे वक्तव्य केले आहे. अशा विचारांमुळे सर्व स्तरांतील महिलांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असे ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सच्या अध्यक्षा वीणा कोहली यांनी म्हटले आहे. बलात्काराला यादव चूक म्हणतात, परंतु समाजात लिंगभेदाचे प्रमाण किती आहे हे अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते, असे ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशनच्या सचिव जगमती सांगवान यांनी म्हटले आहे.