आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mulayam Singh Disagree Over The Foods Security Bill

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्न सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्‍यावरून मुलायमसिंह यादव यांचे घूमजाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अन्न सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देण्याच्या मुद्दय़ावरून सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी घूमजाव केले आहे. सरकार शेतकर्‍यांचे हित अबाधित ठेवत असेल तरच विधेयकाला पाठिंबा दिला जाईल, असे यादव म्हणाले. उत्तर प्रदेशमधील आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्या निलंबनाची दखल घेत संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष घालण्यास सांगितले होते. यानंतर कॉँग्रेस-सपामधील ताणलेल्या संबंधात मुलायम यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.


शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्याचे आश्वासन दिल्यास आम्ही अन्न सुरक्षा विधेयकाला पाठिंबा देऊ, असे मुलायम यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे हित नजरेआड केले जाणार नाही.


कमकुवत वर्गाने शिपाई, चौकीदार व्हावे का?
समाजवादी पार्टीचे प्रमुख खासदार मुलायमसिंह यादव यांनी कमकुवत वर्गातील नागरिकांनी केवळ झाडू मारण्याचे, शिपाई तसेच चौकीदार होण्याचे काम करावे का, असा सवाल केला. लोकसंख्येत 54 टक्के वाटा असलेल्या मागास वर्गातील केवळ 2 टक्के लोक वरिष्ठ पदांवर कार्यरत असल्याचा दावा त्यांनी केला.


500 नवी केंद्रीय विद्यालये
बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभर 500 नवी केंद्रीय विद्यालये स्थापन करणार असल्याची माहिती मनुष्यबळ विकासमंत्री एम. एम. पल्लम राजू यांनी राज्यसभेत सांगितली. मात्र, निधीच्या उपलब्धतेनुसार या संस्था स्थापन केल्या जातील, असे त्यांनी लेखी उत्तरात सांगितले. गेल्या तीन वर्षांत 23 राज्यांनी 133 केंद्रीय विद्यालये स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

तेलंगणा निर्णयामुळे संसदेत विरोधक-सर्मथकांत जुंपली
स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्मितीच्या घोषणेनंतर नव्या राज्यांची मागणी व त्याविरोधातील ‘संसर्ग’ सोमवारी रस्त्यावरून संसदेत पोहोचला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तेलंगणाच्या मुद्दय़ावर विविध पक्षांचे खासदार आक्रमक झाले. बोडोलँडच्या मागणीसाठी आसाममधील खासदारांनी गोंधळ घातला. लोकसभा व राज्यसभेचे कामकाज सुरू होताच आंध्र प्रदेशातील खासदारांनी तेलंगणा निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. खासदारांनी वारंवार अडथळा आणल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले.

लोकसभा दुपारी 3.00 वाजता, तर राज्यसभा 3.15 वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. तत्पूर्वी खासदारांनी तेलंगणाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी केली. याला उत्तर देताना अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले, स्वतंत्र राज्य निर्मिती प्रक्रियेबाबत मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल. घटनेत राज्य निर्मितीबाबत मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. असे असताना विविध राज्यांसंबंधीच्या मुद्दय़ांवर सरकार विचार करत आहे. यामध्ये नद्यांचे पाणीवाटप, सुरक्षा व वीजपुरवठय़ाचा समावेश आहे. मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यानंतर त्यावर विधायक चर्चा केली जाईल.

तेदपा, कॉँग्रेस खासदार आक्रमक
तेलगू देसम व कॉँग्रेसच्या खासदारांनी तेलंगणाला विरोध करत लोकसभा अध्यक्षांसमोरील जागेत गोंधळ घातला. तेदपा खासदारांनी आम्हाला न्याय हवा, या घोषणा दिल्या. सीमांध्रला न्याय देण्याची मागणी करत काँग्रेस खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्यसभेमध्ये कामकाज सुरू होताच तेदपाच्या खासदारांनी सभापतींसमोर येऊन तेलंगणाला विरोध केला. बिस्वजित दायमरी यांनी बोडोलॅँडसाठी आक्रमक पवित्रा घेतला.