नवी दिल्ली - चित्रपटगृहांत विशेषत: मल्टिप्लेक्समध्ये पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून देण्याचा आदेश राष्ट्रीय ग्राहक मंचाने दिला आहे. असे न करणारी चित्रपटगृहे आणि मल्टिप्लेक्सवर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यांना नुकसान भरपाईही द्यावी लागेल, असेही या आदेशात म्हटले आहे.
पिण्याचे पाणी सोबत नेण्यास मनाई असते. काही मल्टिप्लेक्समध्ये तर बाजारभावापेक्षाही महागड्या दराने पाणी विकले जाते. या प्रकारावर राष्ट्रीय ग्राहक मंचाने तीव्र आक्षेप घेत हा आदेश दिला आहे. त्रिपुरा ग्राहक मंचाने चित्रपटगृहांमध्ये पिण्याचे पाणी मोफत देण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला आगरतळा येथील रुपसी मल्टिप्लेक्सने राष्ट्रीय ग्राहक मंचात आव्हान दिले होते. त्यावर न्यायमूर्ती व्ही. के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने नाराजी व्यक्त केली आहे.
चित्रपटासाठी लहान मुले आणि वयोवृद्धही जातात. तीन तास विना पाण्याचे राहणे त्यांच्यासाठी अवघड आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला मोफत पाणी उपलब्ध करून देणे ही प्रत्येक चित्रपटगृहांची जबाबदारीच आहे, असेही न्या. जैन यांच्या न्यायपीठाने म्हटले आहे.
महाग पाणी विकले तर गुन्हा नोंदवा
कॅफेटेरियात महागडे पाणी विकत घेण्यास बाध्य केले जात असेल तर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे न्यायपीठाने म्हटले . चित्रपटगृहांत पुरेशा संख्येने वॉटर प्युरिफायर लावावेत. एखाद्या दिवशी पाणी उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था करावी. - राष्ट्रीय ग्राहक मंच