नवी दिल्ली - मुंबईवर२६ नोव्हेंबर २००८ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीला भारताच्या भूमिकेमुळेच विलंब झाला असल्याचा जावईशोध पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र व्यवहारांचे सल्लागार सरताज अजीज यांनी लावला आहे.
मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी झकी-उर-रेहमान लख्वी याला पाकिस्तानमधील दहशतवादी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर भारताने तीव्र निषेध नोंदवला होता. भारताने नोंदवलेल्या निषेधानंतर लख्वीला कारागृहातच ठेवण्याचा निर्णय पाकने घेतला होता. लख्वी याला पाकिस्तानातील कायदा-सुव्यवस्थेसाठी लागू करण्यात आलेल्या कायद्यानुसार तुरुंगातच ठेवण्यात आले आहे. किमान तीन महिने त्याची आता सुटका होऊ शकणार नाही.
दरम्यान, लख्वी याला जामीन देणा-या विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला असून तशी याचिका सरकारच्या वतीने लवकरच दाखल केली जाणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांनी दिले आहेत. पेशावर शहरातील शाळेवर दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या भीषण हल्ल्यात १४० हून अधिक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर पंतप्रधान नवाझ शरीफ सरकारने देशात फाशीवर असलेली बंदी उठवून दहशतवादी कारवायांत मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या दहशतवाद्यांना फासावर लटकावण्याचा निर्णय घेतला.
भारतामुळेच खोडा
अजीजम्हणाले, ‘मुंबई हल्ल्यासंदर्भातील सुनावणी पाकिस्तानात युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र न्याय समितीला भारतातील काही प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवण्यास भारताकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. सप्टेंबर २०१३ पासून पाकिस्तान असे जवाब घेता यावेत म्हणून भारताला परवानगी मागत आहे. हे जवाब नोंदवले गेले तरच या खटल्याबाबत सुनावणी होऊ शकते. भारत लवकरात लवकर याबाबत परवानगी देईल.